शवविच्छेदन अहवालाने उलगडले पतीचे कारस्थान

0

वाचा देउळगाव राजा येथील घटनेचा थरार

बुलढाणा. देऊळगाव राजा (Deulgaon Raja ) येथे 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना घटनास्थळी पोहोचताच शंका आली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पतीचे बयानही नोंदविले. पण, तो फारशी माहिती देत नव्हता. दोन दिवसांनी शवविच्छेदन अहवाल आला. त्यात महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा निष्कर्ष नोंदविला गेला होता. पोलिसांना पूर्वीपासून असलेली शंका खरी ठरली. अहवाल हाती पडताच पोलिसांनी थेट पतीला उचलून चौकशी सुरू केली. प्रारंभी तो टाळाटाळ करीत होता. पण, खाक्या दाखविताच पोपटासारखे बोलू लागला. पत्नीच्या खुनाचीही कबुली (Confession of wife’s murder) त्याने दिली. शाळेत गेलेल्या मुलाला आणायला पत्नी रस्त्यावर गेली होती. याचा राग आल्याने पत्नीसोबत वाद घालत गळा आवळून खून केल्याचे त्याने मान्य केले.
शिवकन्य सुनील गिते (25) असे मृत पत्नीचे तर सुनील भास्कर गिते (35) असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघेही देउळगाव राजा शहरातील शिवाजी पार्क भागात वास्तव्यास होते. 3 एप्रिलला सकाळी नेहमीप्रमाणे मुलगा शाळेत गेला होता. तो परत येईल म्हणून 10.30 वाजताच्या सुमारास शिवकन्या मुलाला आणण्यासाठी रस्त्यावर गेली होती. याबाबत समजताच सुनीलला कमालीचा राग आला. त्याने वाद घालण्यास सुरूवात केली. यात कारणावरून सुनीलने पत्नीचा गळा आवळून खुन केला होता.

याप्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपी पतीचा जवाब नोंदविला होता. त्याना घटनास्थळ बघितले त्यावेळीच पतीवर शंका आली होती. पण, परिस्थिती लक्षात घेऊन शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात आली. 5 एप्रिल रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुनील गिते यांनी खुनाची कबुली दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.