उद्धव ठाकरे तुमचा गर्व देवानेच ठेचला

0

खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर
अमरावती. तुम्ही ज्या घराण्यात जन्माला आला ते घर टिकवू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाहीत. आमदार सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचे रान केले. रक्ताचे पाणी केले, ते टिकवू शकले नाहीत. महाराष्ट्रच (Maharashtra) काय बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray ) डोळ्यातही अश्रू असतील. त्यांची विचारधारा बुडवण्याचे काम मुलानेच केले. तुमचा गर्व देवानेच ठेचला, अशी घणाघाती टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला. हनुमान जन्मोत्सवानिमित्त राणा दाम्पत्यांकडून आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कारागृहात देण्यात आलेल्या वागणुकीची आठवण सांगताना त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. कारागृहात पाणीसुद्धा दिले जात नव्हते. आपल्या समोर इतरांना पाणी मिळत होते, पण आपल्याला ते मिळत नव्हते, अशी आठवण जड अंतकरणाने त्यांनी सांगितली.

त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात ३३ महिन्याच्या सरकारने हनुमान चालीसा पठण केले म्हणून जेलमध्ये टाकले. आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकार नव्हता का? मुंबईत पाय ठेवला तर तुम्हाला गाडून टाकू अशी भाषा वापरली गेली, तेव्हा महिला म्हणून मला काय वाटले असेल, अला प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलिसांना उद्धव ठाकरेंनी आदेश दिले. कोणत्या गुन्ह्याखाली आम्हाला अटक केली. हे आम्ही विचारले. ते म्हणाले, मॅडम, मला काय विचारू नका, आम्हाला आदेश आहे. ज्या बाळासाहेबांनी रक्त आटवून राज्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये हिंदू विचारधारा दिली. लढणे कशाला म्हणतात ते त्यांनी शिकवले. मात्र त्यांच्या सुपुत्राने ५६ वर्षाच्या मेहनतीला, विचारधारेची माती करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.

अमरावतीनेच लढायला शिकवले
अमरावतीने मला लढायला शिकवले, विदर्भाची सून म्हणून मी मुंबईत दाखल झाली. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? हनुमान चालीसा पठण करा आम्ही धमकी नव्हती तर विनंती केली होती. २५-३० पोलीस घरात घुसले. आम्ही महाराष्ट्राला डाग लावून देणार नाही असं आम्ही सांगितले तरीही बळजबरीने आम्हाला वाहनात बसवून पोलिस स्टेशनला नेले तेव्हा काय वाटले असेल? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला.