बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड,अनेक भागात वीज खंडित

0

-सिद्धू कोमजवार भेटले अभियंत्यांना नागपूर: महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा बिघाड झाल्याने महाल विभागातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यास अडचण निर्माण होत असून महापारेषणच्या बेसा १३२/११ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या १३ वीज वाहिन्यांना पुरवठा करण्यात येतो व या वीज वाहिन्यांनाच्या माध्यमातून महावितरणकडून दिघोरी, जानकी नगर, महालक्ष्मीनगर, ताजबाग, मानेवाडा, बेसा, विहीरगाव या भागात वीज पुरवठा करण्यात येतो. रविवारी २१ मे रोजी महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मेर नादुरुस्त झाल्याने महावितरणच्या वीज ग्राहकांना त्याचा फटका बसला व ग्रेसिया कॉलनी, रामकृष्ण नगर, सरस्वती नगर, अध्यापक नगर, महाकाली नगर, महालक्ष्मी नगर, ताजबाग,
न्यू सुभेदार, जुना सुभेदार, श्रीकृष्ण नगर, आशीर्वाद नगर, भोलेबाबा नगर, उदय नगर, विहिरगाव, लवकुश नगर, दिघोरी टोल नाका, नरसाळा, टेकप सिटी या भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला . १३ पैकी ४ वाहिन्यांवर सद्यस्थितीत इतर उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येत आहे उर्वरित ९ वीज वाहिन्यांना १३२ केव्ही बेसा उपकेंद्रातील दुसऱ्या २५ एम व्ही ए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर द्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे. महापारेषण कंपंनीने नादुरुस्त ट्रान्सफॉर्मेर बदलण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.
२५ एमव्हीए क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बदलण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतु त्यासाठी दोन ते तीन दिवसाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे महावितरणने या ट्रान्सफॉर्मेरवर अवलंबून असलेल्या वीज वाहिन्यांवरील ग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून वरील प्रमाणे वीज पुरवठा सुरु केला आहे. वीज पुरवठा बाधित असलेल्या भागातील विजेची मागणी दिवसा सुमारे १८ मेगावॅट आहे. मात्र सायंकाळी ७ ते पहाटे ४ या दरम्यान विजेची मागणी दुप्पट होऊन तब्बल ३२ मेगावॅटपर्यंत पोहचत आहे.दक्षिण नागपुरमध्ये सतत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिद्धु कोमजवार यांनी अभियंता यांची भेट घेतली. वीज पुरवठा करताना सायंकाळी ७ ते पहाटे ४ या दरम्यान या भागातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा चक्राकार पद्धतीने एक ते दोन तासांसाठी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी या अडचणीच्या काळात जास्त वीज लागणाऱ्या एसी व इतर साधनांचा वापर कमी करून महावितरणला सहकार्य करावे अशी विनंती महावितरणने केली आहे. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे व इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी महापारेषणच्या उपकेंद्राला भेट दिली व दुरुस्ती कार्याचा आढावा घेतला.