Home Breaking news स्‍वा. सावरकरांना नागपूरकरांची अनोखी मानवंदना

स्‍वा. सावरकरांना नागपूरकरांची अनोखी मानवंदना

0

भव्य पुतळा व “अनादि, अनंत, मृत्युंजय” याअल्‍बमचे अंदमानमध्‍ये 12 रोजी विमोचन

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व केंद्रीय मंत्री अमित शहा यांची विशेष उपस्‍थ‍िती

नागपूर, 11 डिसेंबर : “ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला” हे अजरामर देशभक्तीपर गीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 10 डिसेंबर 1909 रोजी ब्रिटनमध्ये असताना ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर लिहिले होते.त्या ऐतिसाहिक क्षणाचे निमित्‍त साधून नागपूरच्‍या युवा कलाकारांद्वारे त्‍यांना अनोखी मानवंदना दिली जाणार आहे.मागील 25 वर्षांपासून स्‍वा. सावरकरांच्‍या साहित्‍याचा अभ्‍यास करणारे नागपूरचे प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी व व्हॅल्‍यूएबल ग्रुपचे अमेय हेटे यांच्‍या प्रयत्‍नांतून अंदमान येथील पहाडगाव परिसरात भव्य सावरकर प्रेरणा पार्क साकारले जात आहे.

या पार्क मध्ये शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्‍या हस्‍ते स्‍वा. सावरकरांच्‍या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री मा. ना. अमित शहा, तसेच राज्‍याचे सांस्‍कृतिक मंत्री मा. ना. आशिष शेलार यांची विशेष उपस्‍थ‍ित राहणार आहे.स्‍वा. सावरकरांनी लिहिलेली व डॉ. धनंजय मोडक यांनी संगीतबद्ध केलेल्या निवडक गीताचे नव्याने शैलेश दाणी यांनी संगीत नियोजन केले आहे.

गायक अमर कुळकर्णी यांच्‍यासह डॉ.मंजिरी अय्यर, सायली मास्‍टे, सोनाली दीक्षित व सारंग जोशी यांनी ही गाणी गायिली आहेत. अनादि मी अनंत मी, हे सदया गण्‍या तार, ने मजसी ने, जयदेव जयदेव जय जय शिवराया, हे हिंदु नृसिंहा, मला देवाचे दर्शन घेवु द्या अशी सहा गीते समाविष्‍ट असलेल्या “अनादि, अनंत, मृत्युंजय” या अल्‍बमचे देखील यावेळी विमोचन केले जाणार आहे.

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमात स्‍वा. सावरकरांवर काम करणा-या संगीतकार व गायक पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर,अभिनेता, दिग्‍दर्शक व निर्माता रणदीप हुड्डा, इतिहासकार व लेखक डॉ. विक्रम संपत व अभिनेते, लेखक व वक्‍ते शरद पोंक्षे यांचा सत्‍कार देखील केला जाईल. त्‍यानंतर होणा-या सांगीतिक सोहळ्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर स्‍वा. सावरकरांची गीते सादर करतील.

अंदमान मध्ये सेल्युलर जेल वगळता स्वा. सावरकर यांच्या स्मृती जाग्या करणारे एकही स्थान नव्हते. नागपूरकरांच्या प्रयत्नामुळे साकारले जात असलेले पार्क व सावरकरांचा पुतळा तेथे येणाऱ्या पर्यटकांना प्रेरणा देत राहील, अशी भावना अमर कुलकर्णी यांनी व्यक्त केली.