
रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टचे विशेष आयोजन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘गाथा श्रीराम मंदिर की’ एक संगीतमय महागाथा रविवार, १४ डिसेंबर रोजी तर ‘संकल्प साधना के 100 वर्ष – राष्ट्र सर्वोपरि’ या संगीतमय संघगाथा सोमवार, १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजन समिती सह सचिव प्रफुल्ल माटेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्ट तर्फे आयोजित व मोहित शेवानी यांची प्रस्तुती असलेले हे दोन्ही कार्यक्रम व्हॉलीबॉल मैदान, आठरस्ता चौक, लक्ष्मीनगर, नागपूर येथे सायंकाळी 6 वाजता होतील. या दोन्ही कार्यक्रमाचे लेखन प्रबुद्ध सौरभ यांनी केले आहे.
‘गाथा श्रीराम मंदिर की’ संगीतमय गाथा
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सुमारे 500 वर्षांच्या लढ्याला अनेक ऐतिहासिक व धार्मिक संघर्षांचे संदर्भ आहेत. अनेक चढ-उतार, कायदेशीर लढाया आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. परिणामस्वरूप, 22 जानेवारी 2024 रोजी भव्य श्रीराम मंदिराचे अयोध्येत उद्घाटन झाले आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी या मंदिरावर धर्म ध्वज फडकला. हा संपूर्ण इतिहास नव्या पिढीला कळावा, या उद्देशाने ‘गाथा श्रीराम मंदिर की’ या दृकश्राव्य संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. नव्या तांत्रिक पद्धतीचा वापर करून श्रीराम मंदिराचा पाचशे वर्षाचा इतिहास जीवंत करणारा हा कार्यक्रम आहे.
‘राष्ट्र सर्वोपरि’ संगीतमय संघगाथा
देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि राष्ट्र निर्माणाच्या संकल्पेला अधोरेखित करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. हिंदुत्वाला पुनरुज्जीवित करणे, हा उद्देश असलेल्या रा.स्व. संघाची शिस्तबद्ध आणि राष्ट्र कार्यास समर्पित विचारांची पालखी पुढे श्रद्धेय गोळवलकर गुरुजींनी आपल्या बळकट खांद्यावरून पुढे नेली. रा. स्व. संघाच्या या 100 वर्षाच्या देदिप्यमान इतिहासाची संघगाथा – राष्ट्र सर्वोपरि’ या कार्यक्रमाद्वारे प्रदर्शित केली जाणार आहे.
नि:शुल्क प्रवेश, प्रवेशिका उपलब्ध
या दोन्ही कार्यक्रमांसाठी प्रवेश नि:शुल्क असून प्रवेशिकांवरच प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशिका 10 डिसेंबर 2025 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान आमदार संदीप जोशी यांचे कार्यालय, 170, आरपीटीएस रोड, लक्ष्मीनगर येथून तसेच साकेत राजुरकर, 552, पीआर साठे मार्ग, देवी अहल्या मंदिराजवळ, धंतोली आणि आशुतोष फडणवीस, मांगल्य, 162, गांधीनगर, नागपूर येथून प्राप्त करता येतील. या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्र कार्यात आपले योगदान द्यावे आणि नव्या पिढीपर्यंत हा संस्कारांचा, समर्पणाचा आणि जाज्वल्य देशभक्तीचा इतिहास पोहोचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयोजन समिती अध्यक्ष आमदार संदीप जोशी हे आहेत.
……….
पत्रकार परिषदेला आयोजन समिती सचिव अनुप राजुरकर व सह सचिव प्रफुल्ल माटेगावकर व आशुतोष फडणवीस, कोषाध्यक्ष CA यश वर्मा, नीरज दोन्तुलवार यांची उपस्थिती होती.




















