Home LOCAL NEWS त्याग, संघर्ष, बलिदान आणि लाखोच्या स्वप्नपूर्तीच्या ‘गाथा श्रीराम मंदिर की’ ने रसिक...

त्याग, संघर्ष, बलिदान आणि लाखोच्या स्वप्नपूर्तीच्या ‘गाथा श्रीराम मंदिर की’ ने रसिक भारावले

0

कुडकुडत्या थंडीतही ‘ जय श्रीराम ‘ च्या घोषात श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर, 14 डिसेंबर : कुडकुडत्या थंडीतही ‘जय श्रीराम’च्या घोषात श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या ‘गाथा श्रीराम मंदिर की’ या संगीतमय महागाथेने नागपूरकर रसिकांना भावनिक आणि वैचारिक प्रवास घडवला. त्याग, संघर्ष, बलिदान आणि अखेरच्या स्वप्नपूर्तीची ही गाथा अनुभवताना रसिक भारावून गेले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य आणि प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी ‘गाथा श्रीराम मंदिर की’ ही संगीतमय प्रस्तुती सादर करण्यात आली. प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित आणि मोहित शेरवानी यांची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल मैदानावर पार पडला. कार्यक्रमाचे लेखन प्रबुद्ध सौरभ यांनी केले होते.

यावेळी विचारवंत, लेखक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रवी भुसारी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आयुषी इंदूरकर, राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सह कार्यवाहिका चित्राताई जोशी, नितिका फार्माचे संस्थापक रवलीन खुराणा, ज्येष्ठ अभ्यासक स्वानंद पुंड या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात झाली. सरिता प्रकाश राजूरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

मोहित शेरवानी यांनी सुभम नाथानी, अभिषेक भारत्रे, अंकिता भारत्रे, श्रीजा उपाध्ये या गायक व वादकांच्या मदतीने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राचीन इतिहासापासून राजा विक्रमादित्य यांनी देशभरात उभारलेल्या राम मंदिरांपर्यंत, 1526 मध्ये बाबराकडून झालेल्या विध्वंसापासून ते सुमारे पाचशे वर्षांच्या संघर्ष, कायदेशीर लढाया आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंतचा प्रवास या कार्यक्रमात प्रभावीपणे उलगडण्यात आला. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी मंदिरावर धर्मध्वज फडकण्यापर्यंतचा ऐतिहासिक टप्पा रसिकांसमोर सादर करण्यात आला.

“दिये जलाओ, मंगल गाओ… राम आये है अयोध्या” या भक्तिरसपूर्ण गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंगल भवन अमंगल हारी, मेरे घर राम आये है, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, श्रीरामचंद्र कृपालू यांसारख्या गीतांनी वातावरण भक्तिमय झाले आणि श्रीराम प्रत्येकाच्या मनात कसे वसले आहेत, हे प्रभावीपणे साकारले गेले.

हा समग्र इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने निर्मित ‘गाथा श्रीराम मंदिर की’ या दृकश्राव्य संगीतमय कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून श्रीराम मंदिराचा पाचशे वर्षांचा इतिहास जिवंत करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समिती अध्यक्ष आमदार संदीप जोशी, सचिव अनुप राजुरकर व सह सचिव प्रफुल्‍ल माटेगावकर व आशुतोष फडणवीस, कोषाध्यक्ष CA यश वर्मा व इतरांचे सहकार्य लाभत आहे.

…….
आज ‘राष्ट्र सर्वोपरि’ संगीतमय संघगाथा

देशभक्‍ती, राष्‍ट्रीय एकता आणि राष्‍ट्र निर्माणाच्‍या संकल्‍पेला अधोर‍ेखित करणा-या राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची स्‍थापना 1925 साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. हिंदुत्‍वाला पुनरुज्जीव‍ित करणे, हा उद्देश असलेल्‍या रा.स्‍व. संघाची शिस्‍तबद्ध आणि राष्‍ट्र कार्यास समर्पित विचारांची पालखी पुढे श्रद्धेय गोळवलकर गुरुजींनी आपल्‍या बळकट खांद्यावरून पुढे नेली. रा. स्‍व. संघाच्‍या या 100 वर्षाच्‍या देदिप्‍यमान इतिहासाची संघगाथा – राष्‍ट्र सर्वोपरि’ या कार्यक्रमाद्वारे प्रदर्शित केली जाणार आहे.