
नागपूर(Nagpur): ‘लाईनमन’ या शब्दाचा अर्थ नेहमीच पुरुष कर्मचाऱ्याशी जोडला गेला आहे, परंतु नागपूरच्या महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या दीपाली खोब्रागडे यांनी आपल्या कामातून आणि जिद्दीतून हा समज मोडीत काढला आहे. येत्या ४ मार्च रोजी ‘लाईनमन दिना’निमित्त नवी दिल्ली(New Delhi) येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात दीपाली यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) आणि टाटा पॉवर-DDL यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातून निवडलेल्या चार कर्मचाऱ्यांमध्ये दीपाली या एकमेव महिला असून, ही बाब नागपूरकरांसाठी आणि महावितरणसाठी अभिमानास्पद आहे.
दीपाली खोब्रागडे यांचा महावितरणमधील १२ वर्षांचा कार्यप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सात वर्षे ग्रामीण भागातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करून केली, तर गेल्या पाच वर्षांपासून त्या नागपूर शहरातील महाल विभागांतर्गत जुन्या शुक्रवारी वितरण केंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वीज वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यापासून ते वीज बिलांची वसुली आणि ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्या अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहेत.
दीपाली यांचे कार्य केवळ तांत्रिक नसून ते मूल्यांवर आधारित आहे. सुरक्षिततेला त्यांनी आपल्या कामात सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. “सुरक्षा साधनांशिवाय काम करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे, त्यामुळे स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पीपीई किटचा वापर करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे,” असे त्या सांगतात. ग्राहकांच्या घरातील अंधार दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हेच आपल्या कामाचे मुख्य प्रेरणास्थान असल्याचे त्या मानतात. याशिवाय, महावितरणच्या स्मार्ट मीटर(Smart meter) योजना आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसारख्या आधुनिक बदलांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीपाली यांची ही कामगिरी भविष्यात अनेक तरुणींना या क्षेत्रात येण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरेल.















