मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गातील शिर्डी-भरवीर या अलीकडेच वाहतुकीस खुल्या झालेल्या टप्प्यात भरधाव ब्रेझा मोटार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन ठार तर तीन जण जखमी झाले. शनिवारी पहाटे वावी गावाजवळ हा अपघात झाला. मयत व जखमी हे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. समृध्दी महामार्गावरील शिर्डी-भरवीर हा ८० किलोमीटरचा टप्पा काही दिवसांपूर्वीच वाहतूक सेवेत दाखल झाल्यामुळे हे अंतर ४० ते ४५ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे.मध्यरात्री या मार्गाने मुंबईहून शिर्डीकडे ब्रेझा मोटार भरधाव निघाली होती. वावी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, मोटारीचा पूर्णत चक्काचूर झाला. मोटारीतील एकाचा जागीच तर दोघांचा उपचार सुरू सुरू असताना मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. अपघातात धरमसिंग मुशिंगे (५१), राघवेंद्र परदेशी (११, दोघे रा. राजेवाडी, बदलापूर, जालना) आणि राजेंद्र राजपूत (४९, फुलंब्री, औरंगाबाद) यांचा मृत्यू झाला.तर मोटार चालक भरतसिंग परदेशी (४३), नंदिनी परदेशी (४०) आणि शिवम परदेशी (१६, तिघेही राजेवाडी, बदलापूर, जालना) जखमी झाल्याची माहिती वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग व वावी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना कोपरगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. अपघातामुळे समृध्दी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे