दत्ताजी डिडोळकर (Dattaji Didolkar) जन्मशताब्दी समारंभात डॉ मोहनजी भागवत (Dr. Mohanji Bhagwat)यांचं प्रतिपादन
नागपूर (Nagpur)
एक काळ होता, संघ परिवारासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. या संघटनांशी संबंध जाहीर करणाऱ्यांना समाज स्वीकारत नव्हता. त्याला लोकांचा विरोध सहन करावा लागायचा. आज परिस्थिती बदलली आहे. वातावरण अनुकूल झाले आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. ही एकीकडे आनंदाची बाब असली, तरी प्रत्यक्षात या अनुकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करणं, प्रतिकूल परिस्थितीपेक्षाही जिकिरीचे आहे. आता अधिक संयम, अधिक सजगता, अधिक काळजी जपत पुढे जायचे आहे. साधन, संसाधनांच्या उपलब्धतेत साधना अधिक कठीण असते, याचे भान जपायचे आहे…असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
बुधवारी नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी (Nitin Gadkari)हे होते. अंजनगाव सुर्जी येथील जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशीष चव्हाण, अजय संचेती, भूपेंद्र शहाणे प्रभृती मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ मोहनजी भागवत यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृतींनाही उजाळा देत, त्यांच्या कार्य व कार्यशैलीचा, व्यक्तिमत्त्वाचा वसा पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
नितीन गडकरी, जितेंद्रनाथ महाराज, आशीष चव्हाण यांनीही स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दत्ताजींच्या स्मृती जपत असतानाच त्यांच्या प्रेरणेने अभाविपचे कार्यकर्ता व व्यक्ती निर्माणाचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन केले.
सुरुवातीला दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समितीचे सचिव व माजी खासदार अजय संचेती यांनी प्रास्ताविकातू मागील वर्षभरातील कार्यक्रम, उपक्रमांचा आढावा घेतला. दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना घोषित झालेला पुरस्कार यंदा संभाजीनगर येथील ओंकार विद्यालयाला प्रदान करण्यात आला.
दत्ताजींच्या जीवनावरील आधारवड या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे व हिंदी भाषेतील दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहल पाळधीकर यांनी सरस्वती वंदना, अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार प्रदर्शन पायल किनाके यांनी केले. सीमा सालोडकर यांनी गायलेल्या वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमात रा. स्व. संघाचे सुनील आंबेकर, डॉ. रामदास आंबटकर, डॉ. विलास डांगरे, कांचन गडकरी, अरुण लखानी, बाळासाहेब दीक्षित, अनिरुद्ध देशपांडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, सुनील पाळधीकर, डॉ. मुरलीधर चांदेकर, जयंत पाठक, डॉ. नारायण मेहरे आदी उपस्थित होते.