एनडीसीसी बँकेची शेती लिलावाची प्रक्रिया थांबली, 15 दिवसात बैठक -आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन

0

नागपूर :प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी आज मंगळवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर धडक देत शेतकऱ्यांच्या शेतीचे लिलावाची प्रक्रिया हाणून पाडली. शेतजमिनीचा लिलाव होऊ देणार नाही आणि झालाच तर ती घेणाऱ्यांचे हात पाय आम्ही तोडू, असा इशारा देण्यात आला. नागपूर जिल्हा सहकारी बॅंक कर्ज थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव करीत आहे. याविरोधात बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात आपली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून येत्या 15 दिवसात जिल्हाधिकारी,आमदार बच्चू कडू, संबंधित लोकप्रतिनिधी आणि थकबाकीदार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या सर्वांची बैठक होणार असून या बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. एन डी सी सी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील तूर्तास या बैठकीपर्यंत लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचे माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले. दरम्यान,यावेळी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन २००३ मध्ये झालेल्या १३० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात चौकशी करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली. यामुळे काँग्रेसचे नेते, आमदार सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मालमत्तांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू असून आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मालमत्तांच्या जप्तीला स्थगितीची मागणी लावून धरली आहे.
नागपूर जिल्ह्यातील तब्बल ३०० शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार असून तशा नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये वेणूबाईं पाचपोहर यांचे नातेवाईक सागर वामनराव पाचपोहर यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली. तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. कोरोना काळात हा विषय पुन्हा मागे पडला. आता बॅंकेने थेट लिलाव सुरू केला आहे. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा