“संजय राऊतांसारख्या निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ…” : फडणवीस

0

 

पुणे : शिवसेना पक्ष व धनुष्यबाणावर ताबा मिळविण्यासाठी २ हजार कोटी रुपायांचे पॅकेज वापरण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्या आरोपांचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)यांनी “निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ” या शब्दात राऊतांचा उल्लेख केला. “राजकारणात माणूस कधी वर जातो तर, कधी खाली जातो. मात्र इतके निराश होऊन मनात येईल ते बोलल्यामुळे लोक त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही. मात्र लोकांना वाटते की आपण ज्यांना मोठे नेते म्हटलं तेच नेते संजय राऊतांसारखं निर्बुद्धपणे बोलतात. त्यामुळे अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ” असे फडणवीस म्हणाले. पुणे येथे आगमन झाले असता ते माध्यमांशी बोलत होते.

ठाकरेंकडे ठराविक शब्दांची ‘डिक्शनरी’

फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. त्यातीलच शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.

मविआचा अहंकार आडवा आला

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, 12 आमदारांच्या संदर्भातील पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिले होते, अजित पवारांनी नाही. राज्यपालांची मुलाखत मी संपूर्ण पाहिली नाही. पण, ते जे बोलले, त्यातील बाबी सत्य आहेत. या पत्रानंतर काही नेते त्यांना भेटायला गेले, तेव्हा राज्यपालांनी त्यांना स्पष्टच सांगितले होते की, योग्य प्रारुपात पत्र पाठवा. अशा धमक्यांच्या पत्रावर मी निर्णय घेणार नाही. पण, मविआचा अहंकार आडवा आला आणि त्यांनी सांगितले की आम्ही ते पत्र बदलणार नाही. एमपीएससीसंदर्भात राज्य सरकारने तत्परतेने निर्णय घेऊन नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यासंदर्भात एमपीएससीला विनंती केली होती. महाराष्ट्रात एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, आम्ही त्यांना निर्देश देऊ शकत नाही, विनंती करु शकतो. त्यांनी आमचे पत्र संपूर्ण सदस्यांपुढे ठेवले पण त्यांचे मत चालू वर्षा पॅटर्न लागू करण्यासंदर्भात होते. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेरविनंती केली. त्यामुळे राज्य सरकारकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे. आमच्या विनंतीला ते मान देतील, अशी खात्री आहे. पण, तरी गरज पडलीच तर न्यायालयात जावे लागेल. कारण, विद्यार्थी हित सर्वोच्च आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा