आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या, श्रीकांत शिंदेनी सुपारी दिली-संजय राऊत

0

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी नवाच आरोप करून खळबळ माजवून दिली. शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप त्यांनी केलाय. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut complaint against Shinde Camp) यांनी केला आहे. यासंदर्भात राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिले आहे. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत काही जणांची नावे असून त्यांच्याकडून आपल्याला धोका असल्याचा राऊतांचा दावा आहे.
दरम्यान, राऊतांच्या आरोपांवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर चौकशीत तसे काही आढळले नाही तर संजय राऊतांवर मानहानीचा दावा करण्यात येईल. याची चौकशी झालीच पाहिजे. पण ही केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचे दिसतेय, असेही ते म्हणाले.
कायदा-सुव्यवस्था नाही-ठाकरे
संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. गद्दार आमदारांनी माहिमध्ये गोळीबार केला. त्याची नोंदही पोलिस ठाण्यात आहे. काही आमदारांनी मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई केली नाही. या सगळ्यावरुन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.