प्रवीण महाजन नागपूर
पाऊस पडतो. धो धो बरसतो. घरांवर, झाडांवर, पहाडावर, रस्त्यांवर….पाऊस पडतो आणि वाहून जातो. त्यातले किती पाणी लोक प्रत्यक्षात वापरतात, हा मात्र प्रश्नच आहे. कारण अंगणात, शेतातले पाणी निदान जमिनीत तरी मुरते. पण घराघराच्या छतांवरचे जे पाणी नाल्या, नद्यांमधून सरळ समुद्रात पोहोचते, ज्याचा जरासाही उपयोग माणसं करत नाहीत, त्याचं काय? अक्षरशः लाखो लिटर पाणी पावसाळ्यात उपयोगाविना वाहून जाते. आकाशातून जमिनीवर, जमिनीवरून समुद्रात…असाच त्याचा प्रवास असतो. मग
रेन वॉटर हार्वेस्टिंगचा काय उपयोग? हा अगदीच महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आधी स्वतःला आणि मग दुसऱ्यालाही विचारण्याजोगा….कारण जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना पावसाळ्यात पावसाच्या स्वरुपातील निसर्ग कॄपेचा उपयोग न करता पाणी वाया जाऊ देणे, ते साठवण्याचा प्रयत्न न करणे हा कॄतघ्नपणा आहे. पण करता काय, हे असंच चाललं आहे अलीकडे. निसर्गाच्या सान्निध्यात फक्त विकेंडला राहायचे असते अशा समजुतीतून उर्वरीत काळात निसर्गाचे फक्त दोहन करणाऱ्या गर्दीचा एक हिस्सा बनून राहिलो आहोत आपण सारे. वॄक्षारोपण फोटो काढण्यापुरते आणि वॄक्षतोड मात्र जोरात करायची. पाणी वापरताना जराही चिंता करायची नाही. जगात पिण्यायोग्य पाणी फार कमी ऊपलब्ध असल्याच्या वस्तुस्थितीवर बोलायचे मात्र जोरात, अशा विचित्र वागण्याच्या मानवी तर्हेला निसर्गही असा किंवा तसा हुलकावणी देऊ लागला आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा पाऊस अजून कशाचे लक्षण मानायचे?
आज, गावागावात, शहराशहरात पावसाचे वाया जाणारे पाणी बघून कोण म्हणेल या देशात चार हजार वर्षांपूर्वीपासून असे पाणी जतन करून ठेवण्याची व्यवस्था होती म्हणून? असं म्हणतात की, रेन वाॅटर हार्वेस्टिंगची कल्पना सर्वप्रथम सहा हजार वर्षांपूर्वी चीन मध्ये अंमलात आली. भारतीय इतिहास चार हजार वर्षांपूर्वीच्या उदाहरणांची साक्ष देतो. पण कालौघात माणसं इतकी बेजबाबदार वागू लागली की, आमला रुईया यांनी निर्माण केलेली उदाहरणे, राजेंद्र सिंह यांनी राजस्थानात पाण्यासाठी केलेली वणवण आम्हाला कवडीमोल वाटू लागली आहे. दिवसाकाठी सरासरी एक ते पंचेचाळीस लिटर पाणी एक माणूस वाया घालवतो, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पावसाचे किमान तीस टक्के पाणी तर सरळ सरळ समुद्रात पोहोचते. उपाययोजना केली तर ते पाणी वाचवले, साठवले जाऊ शकते. पण त्यासाठी घराच्या छतावरच्या आउटलेट मधून थेट जमिनीवर पडणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपाय योजावे लागतील ना! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उदोउदो फक्त होतो. बघा एकदा स्वतःच्या घराच्या छताकडे. नजर एकदा सभोवताली. बघा किती घरांमध्ये, किती वसाहतीत, किती सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था आहे. डोके चक्रावून टाकणारी परिस्थिती ध्यानात येईल. तामिळनाडू हे, रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करणारे भारतातील पहिले राज्य आहे. आरडीपीआरच्या मदतीने कर्नाटकातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम हा आजघडीला भारतातील सर्वात मोठा प्रकल्प ठरतो आहे.
पाऊस हे निसर्गाने पॄथ्वीला दिलेले वरदान आहे. त्या पावसाचा पुरेपूर वापर करण्याचे नियोजन आवश्यक आहे. शेती टिकविणे, जलाशयात जलसंवर्धन करणे या पलीकडे, ते पाणी विहिरीत सोडणे, कोरड्या तलावांपर्यंत ते प्रवाहीत करणे, जमिनीत मुरविणे देखील आवश्यक आहे. तसे केल्यास त्या त्या परिसरातील जमिनीखालील पाण्याची पातळी वाढवणे शक्य होईल. आणि हे सर्वदूर व्हायला हवे. खाजगी घर, दवाखाने, शाळा, महाविद्यालये, काॅलनी, सोसायटी, इन्स्टिट्यूट्स, क्लब, उद्योग, झोपडपट्टी….अगदी कुठेही, कोणीही हे काम करू शकतो. निसर्गाचे संवर्धन करणारा, सोपा, आवश्यक, आर्थिक दॄष्टीसे परवडणारा असा हा उपाय स्वीकारला मात्र जात नाही, म्हणूनच पावसाचे तीस टक्के पाणी आम्ही वाया घालवतो, हीच खरी शोकांतिका आहे.