दुरून बघायला विमानाचा प्रवास आनंददायी, आरामदायी, मजेदार, श्रीमंत वैगेरे वाटतो. हो ना! तसा तो असतोही. वर आकाशात उमटणाऱ्या, विमानातून बाहेर पडणाऱ्या धुरांच्या रेषाही बऱ्याच बोलक्या असतात. मात्र, विमानं चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधन ज्वलनाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड व वातावरणाचे तापमान वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणारे अन्य घातक वायू, त्याचा ढग तयार होण्याच्या प्रक्रियेवर होणारा विपरीत परिणाम, या साऱ्याच गोष्टी अत्यंत घातक आहेत. ओझोन आणि मिथेन वायूचे प्रमाण कमी होणे, विमानाच्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, मनुष्य प्राणी जगतात कार्डिओव्हस्कुलर रिस्कमध्ये सतत होत असलेली वाढ, अशाही बऱ्याच गोष्टी आहेत. एकदा का विमानाचे इंजिन सुरू झाले की,
कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड आदी घटक बाहेर पडतात. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील हायड्रोकार्बन, सल्फर ऑक्साईड, ब्लॅक कार्बन आदी घटक आपसात आणि वातावरणातील घटकांच्या संपर्कात येतात तेव्हा उद्भवणारे परिणाम तर केवळ नकारात्मकच असतात…. जगभरात ४ अरब प्रवाशी, ३७ लक्ष विमानांची उड्डाणे आणि पुढील दशकात हे प्रमाण दुपटीने वाढणार असल्याचा अंदाज… प्रदूषणाच्या दॄष्टीने चिंताजनकच आहे.
प्रदूषण, मग ते हवेचे असो वा पाण्याचे, ध्वनिप्रदूषण असो वा विद्युत रोषणाईमुळे होणारे प्रदूषण असो, त्याचा त्रास सर्वांनाच होतो. भारतातील वायू प्रदूषणाने तर असा कहर केला आहे, की त्याचा परिणाम केवळ या देशातील नागरिकांनाच नव्हे, तर शेजारच्या श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आदी देशांनाही भोगावा लागतो आहे. गत काही वर्षांत भारतातील विमानसेवेची, विमान आवागमनाची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित वायूमुळे देशाच्या सीमेतील आणि सभोवतालही आकाशमंडळ प्रभावित झाले आहे. त्याचा ओझोन आवरणावर होणारा विपरीत परिणामही सर्वदूर दिसतो आहे. ओझोन एकीकडून दुसरीकडे वाहून नेला जाण्याचा परिणामही या प्रक्रियेत घडून येतो आहे.
अमेरिकेतील कोलोराडो येथील रसायनशास्त्र आणि ॲट्माॅस्फरिक सायन्स विभागाने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. प्रामुख्याने विमान वाहतुकीमुळे होणारे परिणाम, वातावरणात होणारे बदल, याचा अभ्यास या संस्थेमार्फत केला जातो. ज्यावेळी सूर्यकिरणे मानवनिर्मित प्रदूषणकारी घटकांवर अथवा नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड, व्होलाटाईल ऑर्गनिक कार्बन या सारख्या घटकांवर आदळतात तेव्हा, जो रंगहीनही असतो आणि नियंत्रणास अतिशय कठीण असतो, अशा बॅड ओझोनची निर्मिती दखलपात्र प्रमाणात होते. आणि म्हत्वाची बाब अशी की रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांपासून तर सतत धूर सोडणाऱ्या वीज निर्मिती केंद्राद्वारे या घटकांची निर्मिती अविरत सुरू असते. वायू प्रदूषणाने घातक स्थिती निर्माण केली आहे, अशा देशांपैकी एक असलेल्या भारतातील वायू प्रदूषणाने इतकी उंची गाठली आहे की, दरवर्षी किमान १.२ दशलक्ष लोक इथे प्रदूषणाने मरत आहेत. पाच वर्षांखालील मुलांची नैसर्गिक वाढ खुंटणे हा देखील या प्रदूषणाचा एक नकारात्मक परिणाम आहे. उपरोक्त संस्थेचे एम. डेव्हिड आणि ए. आर. रविशंकर यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, या प्रदूषणयुक्त वायूमुळे केवळ भारतातीलच नव्हे तर, भारतीय उपखंडातील अन्य देशांतही परिणाम जाणवू लागले आहेत.
भारताने स्वतःसाठी निर्धारीत केलेल्या निकषांनुसार ग्राऊंडलेव्हल ओझोनची पातळी ५० पीपीबी एवढी आहे. पण बव्हतांश स्टेशन्सवर ही पातळी सदैव त्याच्या वरच असल्याचे या अभ्यासकांना आढळून आले आहे. इंडिगो जेनेटिक विमानातून प्रदूषित वायू उत्सर्जन थांबले तरच या प्रमाणात सकारात्मक बदल निदर्शनास येऊ शकतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असले, तरी प्रत्यक्षात ते कसे शक्य होईल हा खरा प्रश्न आहे.
सदर संस्थेच्या अभ्यासातून अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती अशी की एकीकडे भारतांतर्गत घडामोडींचा परिणाम सभोवतालच्या देशांवर दिसून येत असतानाच उत्तर भारतात मात्र, सभोवतालच्या देशांतील घडामोडींमुळे वातावरण प्रदूषित झाले व होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित देशांतील घडामोडींवर नियंत्रण मिळवता आले तरच उत्तर भारतातील ओझोन प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल. या पार्श्वभूमीवर भारत आणि शेजारी देशांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची गरज देखील प्रतिपादीत होऊ लागली आहे. भारत सरकारच्या माध्यमातून देशातील १०२ शहरांमध्ये NCAP प्रोग्राम अंमलात येणार आहे. पण, यात ओझोन आवरणावरील प्रभावाचा अद्यापही तितकासा विचार होत नसल्याची तज्ज्ञांची चिंता आहे. त्यामुळे या एकूणच परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सर्वसंमत अशा प्रभावी उपाययोजनांचा आराखडा तयार होण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे.
प्रवीण महाजन, नागपूर.