मविआत कोणालाही फरफटत न्यायचे नाही-पटोले

0

मुंबईः आम्हाला महाविकास आघाडीत कोणालाही फरफटत आणायचे नाही. भाजपच्या विरोधात आमची लढाई सुरू असून जे सकारात्मकरित्या या युद्धात असतील ते आमचे सोबती आहेत, असे स्पष्ट मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Maharashtra Congress President Nana Patole) मुंबईत बोलताना व्यक्त केले. महाविकास आघाडी टिकणार की नाही, यावर चर्चा सुरु असताना पटोले यांनी भूमिका मांडली. लोकशाही व्यवस्था संपवण्याचे पाप नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार करत आहे. त्या विरुद्ध आमची लढाई आहे. काँग्रेस ती लढाई प्रत्येक स्तरावर लढत आहे. त्याचे परिणामही आम्हाला भोगावे लागत आहेत, असे पटोले म्हणाले.
पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. सोनिया गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांची वारंवार ईडीकडून चौकशी केली जात आहे. वारंवार ईडीच्या चौकशीसाठी बोलावले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या त्रासाच्या पुढे काँग्रेस जात आहे. आम्हाला कोणालाही फरफटत न्यायचा कार्यक्रम नाही. भाजपच्या विरोधातली आमची लढाई आहे. कारण ते देशहिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम्हाला कोणालही फरफटत आणायचे नाही. जे सकारात्मक या युद्धात असतील, ते आमचे सोबती आहेत. वज्रमूठ सभा संपलेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.