पोलिसानेच झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर
ब्रजरानगर. ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास (Odisha’s Health Minister Naba Kishoredas ) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर गोळीबार (firing ) करण्यात आला आहे. ओडिशातल्या झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ (Brijrajnagar in Jharsuguda district ) त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने अगदी जवळून त्यांच्या दिशेने 4 ते 5 गोळ्या झाडल्या. त्यातील काही त्यांच्या छातीत शिरल्या आहेत. गोळीबार करणारा सहायक पोलिस निरीक्षक गोपालदास याला अटक करण्यात आली आहे. गोळीबार करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पोलिस अटकेतील आरोपीची कसून करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12.15 च्या सुमारास हा हल्ला झाला. नबा दास ब्रजराजनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कारमधून उतरताच गोपालदास याने त्यांना गोळ्या घातल्या. सध्या नबा दास यांना पुढील उपचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेद्वारे भुवनेश्वरला हलवण्यात आले आहे
हल्लेखोराचा गोळीबारानंतर पळण्याचा प्रयत्न
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आरोग्यमंत्री नबा दास या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती. तेव्हा अचानक कुणीतरी त्यांच्यावर गोळीबार केला. एक पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. त्यानंतर तो पळून जात असताना दिसला. या घटनेचा व्हीडिओ झपाट्याने व्हायरल होतो आहे. त्यात नबा दास यांच्यावर एकामागून गोळ्या झाडल्या जात असल्याचे, ते बघून एकच धावपळ उडत असल्याचे दिसते. गोळीबारानंतर नबा दास खाली कोसळतात. या घटनेनंतर संपूर्ण राज्यच हादरले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या आरोग्यमंत्र्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, हल्ल्याचे वृत्त ऐकून स्तब्ध झालो. मी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना करतो. गुन्हे अन्वेषण विभागाला मी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत