अकोला लोहमार्ग पोलिसांची कामगिरी, आरोपी अटकेत
अकोला. अकोला रेल्वेस्थानक (Akola Railway Station ) परिसरातून शुक्रवारी २७ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता चार वर्षीय मुलाचे अपहरण (Kidnapping of a four-year-old boy ) करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक लोहमार्ग पोलिसांकडे (Railway Police ) तक्रार करण्यात आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने शोधाशोध सुरू केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची मदत घेण्यासह तांत्रिक तपासही करण्यात आला. आरोपी जाण्याची शक्यता असेल त्या सर्व ठिकाणी पाळत ठेवण्यात आली होती. शोधाशोध सुरू असताना शनिवारी अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. रेल्वे पोलिसांनी बसस्थानक परिसरातून आरोपीला पकडले. त्याच्या ताब्यातून मुलाची सुखरून सुटका केली. त्यानंतर मुलाला आईच्या स्वाधीन करण्यात आले. बेपत्ता मुलगा परत मिळाल्याने आईच्या डोळ्यांत पाणी तराळले. तिने पोलिसांचे आभार मानले.
पूजा सिद्धात खरात यांचा चार वर्षीय मुलगा हा शुक्रवारी २७ जानेवारीला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरात खेळत होता. आई त्याच्यावर लक्ष ठेवूनच होती. पण, अचानक तो बेपत्ता झाला. मुलगा कुठेही सापडत नसल्याने आई कमालीची घाबरली होती. तिथे थेट पोलिस ठाणे गाठून मुलगा शोधून देण्याची गळ पोलिसांना घातली. त्यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यास फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा रेल्वे पोलिसांनी दाखल करून घेतला. तातडीने तपास सुरू करण्यात आला.
त्यानंतर लगेच रेल्वे पोलिस ठाण्याचे ठाणेदार अर्चना गाढवे यांनी पोलिस उपनिरीक्षक दिलीप वानखडे, दिलीप जाधव, सतीश चव्हाण, प्रवीण मुंढे, संतोष वडगिरे, विजय रेवेकर, उल्हास जाधव व अमोल अवचार यांचे पथक गठीत केले. या पथकाने लगेच मुलाचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक व्यक्ती या मुलासोबत बोलत बोलत त्याला रेल्वे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर घेऊन जाताना दिसून आला. पुढे एक एक धागा जोडत पोलिसा आरोपींपर्यंत पोहोचले. त्यावेळी आरोपी मुलाला घेऊन बसने इतरत्र जाण्याच्या तयारीत होता. तुर्त आरोपीने मौन बाळगले आहे. चौकशीतून त्याचे मनसुबे स्पष्ट होणार आहेत.