नागपूर. सोशल मीडिया जगाला जोडणारे प्रभावी माध्यम ठरले आहे. मात्र त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या माध्यमाचा कुणाकडून कशासाठी वापर केला जाईल ते सांगताच येत नाही. बरेचदा यूट्यूबवर (YouTube ) बघून केलेले प्रयोग घातक ठरले आहेत. अनेकांना जीवाची किंमतही मोजावी लागली आहे. नागपूर (Nagpur) शहरातूनही असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीने यूट्यूबवर बघून स्वतःची प्रसूती करवून घेतली (teenage girl gave birth to herself after watching it on YouTube). यात बाळ दगावलेच, शिवाय मुलीची प्रकृतीही खालावली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर समाजमन पुरते हादरले आहे. मुलांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
हा संपूर्ण घटनाक्रम नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. एक- दोन महिन्यांच्या चॅटिंगनंतर एका दिवशी आरोपी तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. या भेटीदरम्यान दबाव टाकून शारीरिक संबंध ठेवले. या भेटीनंतर दोघे भेटलेही नसल्याचे सांगतले जाते. पण, नकळत ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ३ मार्चच्या रात्री तिची प्रसूती झाली. तिने बाळाला जन्म दिला. पण, काहीवेळातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस मुलीपर्यंत पोहोचले. तिची प्राथमिक विचारपूसही केली. पण, तिची प्रकृती चिंताजणक असल्याने चौकशीवर मर्यादा आहेत. तुर्त पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पोस्टमार्टमनंतरच बाळाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील आरोपी यादव नावाचा युवक असल्याचे सांगितले जात आहे. पण, ते त्याचे खरे नाव असेल, याबाबतही शंकाच आहे. आरोपीचे हे नाव इंस्टाग्रामवरील आहे. तुर्त पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाळाचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वीसुद्धा असे प्रकार समोर आले आहेत.