रत्नागिरी. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची आज रत्नागिरीतील खेड (Khed in Ratnagiri) येथे जाहीर सभा होणार आहे. खेड हा माजी मंत्री रामदास कदम (Former minister Ramdas Kadam) यांचा बाले किल्ला मानला जातो. इथे होणाऱ्या सभेत ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, त्यांच्या सभेपूर्वीच रामदास कदम यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. माझ्यावर काहीही आरोप केले तर थेट मानहानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय कदम यांनी आज सकाळी रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.
रामदास कदम यांनी संजय कदम यांच्यावरही पलटवार केला आहे. रामदास कदम हे बंगाली बाबा आहेत. ते पर्यावरण खात्याचे मंत्री असताना मिळालेल्या पैशांतून त्यांनी आपला मुलगा योगेश कदम यांना आमदार केले, असा आरोप संजय कदम यांनी केली. या आरोपानंतर रामदास कदम यांनीही स्पष्टच इशारा देऊन टाकला. रामदास कदम म्हणाले म्हणाले की, त्यांचा अजिबात अभ्यास नाही. गावठी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पाच वर्षात ते विधिमंडळात कितीवेळा बोलले, याची माहिती काढा, म्हणजे कळेल. मुळात पर्यावरण खात्याला आर्थिक निधीची कोणतीही तरतूद नव्हती. तसेच हे खातेही अस्तित्वात नव्हते. वन आणि पर्यावरण विभाग असे खाते होते. ते तोडून बाजुला केले. मला काहीतरी द्यायचे म्हणून ते खाते मला दिले. त्याला शून्य बजेट होते. पण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मुनगंटीवारांना सांगून मी निधी घेतला आणि तलावाची कामं केली. तुम्ही जो प्रश्न मला विचारला आहे, त्याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. त्यांच्यावर मी १०० टक्के मानहानीचा दावा ठोकणार आहे, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.