मुंबईः गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला (State Cabinet Decisions) आहे. या योजनेचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने दिवाळीत हा आनंदाचा शिधा दिला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल, असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाणार आहे.
ज्या ठिकाणी ई-पॉसची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने राबविली जाणार आहे. २०२२ मध्ये दिवाळीनिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती.
गुढीपाडवा, आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा
Artical Blog
Hindi News
Artical Blog
















