145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही-अजित पवार

0
ajit pawar

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असा नेतृत्वाची स्पर्धा सुरु झाल्याचे संकेत मिळत असतानाच अजित पवार यांनी या वादावर स्पष्टीकरण (NCP Leader Ajit Pawar on Leadership Issue) दिले आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर ‘अजित दादा भावी मुख्यमंत्री’ असा संदेश देणारे होर्डिंग लावले गेले. त्यावर बोलताना अजित पवार यांनी “145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, त्यामुळे त्या बॅनरचं मनावर घेऊ नका…” असे स्पष्टीकरण दिले. जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही. तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. “ उद्या कोणीही उठून भावी पंतप्रधान असे बॅनर लावेल. अतिउत्साही कार्यकर्ते असे प्रकार करीत असतात. मात्र लोकशाहीत अतिउत्साहापेक्षा मॅजिक फिगर 145 ला महत्त्व आहे, हे लक्षात घ्या…” असेही अजित पवार म्हणाले.
गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर ‘जयंत पाटील भावी मुख्यमंत्री’ असा संदेश देणारे होर्डिंग लागले होते. त्यानंतर आता काही दिवसांतच ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री.., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..’ अशा आशयाचे मजकूर असलेले होर्डिंग लावले गेले आहे. त्यावरून राष्ट्रवादीत नेतृत्वाची स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आमदार निलेश लंके यांनी जाहीरपणे अजित पवार यांची पाठराखण करताना अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले होते. निलेश लंके यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी या शक्यता फेटाळून लावल्या होत्या. शरद पवार यांनीही त्यावेळी संख्येचा मुद्दा मांडला होता. आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते, असेही पवार म्हणाले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा