पुणे : पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अतिशय महत्वाचे विधान केले. “पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली व त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले” याकडे शरद पवार यांनी आज लक्ष वेधले. “प्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला…” असेही पवार (NCP President Sharad Pawar on State Politics) म्हणाले. या शपथविधीची आपल्याला कल्पना होती, असे संकेतही पवार यांनी यावेळी बोलताना दिलेत. मागील काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीच्या मुद्यावर जोरदार राजकीय चर्चा सुरु आहे. आज पवार यांना त्याबद्धल विचारले असता त्यांनी ही माहिती उघड केली. या शपथविधीची पवार यांना कल्पना होती, असे विधान यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
त्या शपथविधीवर पवार यांना बुधवारी एका पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. अजित पवार त्यावर काहीच बोलत नाहीत, याकडेही पवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी पवार म्हणाले की, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलण्याची काय गरज आहे. समजेन वाले को इशारा काफी है, म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याला पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती होती, हे मान्य केले. पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी बोलताना फडणवीस यांनी ते अजित पवारांचे बंड नव्हते, तर शरद पवारांशी चर्चा करूनच सारे ठरले होते पण नंतर या गोष्टी बदलल्या, असा गौप्यस्फोट केला होता. पवारांनी आज त्याला दुजोरा दिला.