व्हॅलेंटाइन दिनी बजरंग दलाची ‘इशारा रॅली’ उपराजधानीत फिरून वेधले लक्ष

0

नागपूर. व्हॅलेंटाइन डेला (Valentine’s Day ) विरोधाची मालिका यंदाही बजरंग दलाने (Bajrang Dal) कायम ठेवली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून देखभरात आंदोलन केले जात आहे. रस्त्यावर उतरून प्रेमवीरांना इशारा दिला जात आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रेमीयुगुलांना हुसकावून लावल्याचेही वृत्त पुढे येत आहे. उपराजधानी नागपुरातही (Nagpur) बजरंग दलाकडून इशारा रॅली काढण्यात आली. शहराच्या महत्त्वाच्या मार्गांवरून रॅली स्वरूपात फिरून संकृतीवरील घाला खपवून घेणार नसल्याचे या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. दुचाक्यांवरून बॅनर घेऊन ही रॅली प्रमुख रस्त्यांवरून पुढे जात असल्याचे दिसत आहे. दिवसभर कार्यकर्ते अशाच प्रकारे फिरतील कुठेही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांना अद्दल घडविली जाईल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. व्हॅलेंटाइन डे समर्थकांना हा दिवस साजरा करण्याचा हक्क असेल तर आम्हालाही आमची संस्कृती जपण्याचा अधिकार असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे.

जगभरात व्हॅलेंटाइन डेचा जल्लोष सुरू आहे. तरुणाईच्या उत्साहाला अगदी उधान आल्याचे दिसते आहे. बाजरपेठा गुलाबाच्या फुलांनी सजल्याचे दिसून येत आहे. हॉटेल्स, पब्समध्ये विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काही हॉटेल्समध्ये प्रेमीयुगुलांसाठी विशेष सूटही दिली गेली आहे. यामुळे प्रेमीयुगुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व विरोध झुगारून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात त्यांची व्यस्तता दिसून येत आहे.
पंडितजी सोबत, लग्न लावून देणार

बजरंग दलाकडून नागपूर शहरातून बाईक रॅली काढण्यात आली आहे. त्याला इशारा रॅली असे नाव देण्यात आले आहे. रॅलीतील कार्यकर्त्यांनी गंभीर इशारा दिला आहे. आमच्या सोबत पंडितजी देखील आहेत. रस्त्यात एखादे जोडपे भटकताना सापडले तर आम्ही त्यांचे लग्न लावून देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांनीही चोख व्यवस्था ठेवली आहे. नागपूर शहरातही चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रेमवीरांना आवर घालण्यासोबतच व्हॅलेंटाईन डेला विरोध असणाऱ्यांकडून गैरप्रकार होणार नाही याची काळजीही त्यांना घ्यावी लागत आहे.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा