सोलापूर – राज्य सरकारकडून 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल 350 रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे जाहीर केल. आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 350 ते 400 गाड्यांची आवक नोंदवली गेली.
मात्र,यामुळे कांद्याचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे शासनाविरोधात संतापाची भावना आहे.सध्या कांद्याला प्रति किलो 2 ते 5 रुपये सरासरी दर मिळताना दिसून येत आहे. मात्र, यातील बहुतांश शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पीकपाण्याची नोंदच केली नसल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना कसा मिळणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 मध्ये बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्याबाबत शासन काही निर्णय घेणार की, त्यांना वाऱ्यावरच सोडणार असा प्रश्न देखील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत.