विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध म्हणून विरोधी पक्षातील आमदारांनी शुक्रवारी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

‘काय निर्लज्जपणा चालवलाय’ या जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून त्यांना हिवाळी अधिवेशनपुरते निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडीने गुरुवारी सभात्याग केला होता. तीच भूमिका कायम ठेवत आज शुक्रवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. या संदर्भात विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले,’जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेत त्यांना सभागृहात बसू द्यावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, ती मान्य होत नसल्याने आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. कर्नाटक सरकार महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव करत आहे. आता तरी आपल्या सरकारने सोमवारी सीमावादावर ठराव आणावा. आमचा त्याला विरोध राहणार नाही.’ जितेंद्र आव्हाड म्हणाले,’काल ठाण्यात आंदोलन झाले. शिंदे सरकार, मिंधे सरकार’ अश्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा देणाऱ्यांना आता अटक होण्याची माहिती आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिस आयुक्तांना तसा फोन गेल्याची माहिती आहे. आम्ही गांधींना मानणारे आहोत. अश्या अटकेला आम्ही घाबरत नाही. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार दबविण्याचा प्रयत्न आहे.’

एयू म्हणजे अनन्या उदास


सत्तापक्ष गैरसमज पसरवित आहे. काल एयू वरून त्यांनी गदारोळ केला. वास्तविक पाहता रिया चक्रवर्तीने स्वतः एयू म्हणजे अनन्या उदास हे स्पष्ट केले आहे. अनन्या ही माझी मैत्रिण आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,’ असे अजित पवार म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी बसवून सरकार ३२ वर्षीय तरुणाला किती घाबरले आहे, हे दिसून आल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सरकारचे ‘सत्तामेव जयते’


आम्ही सत्यमेव जयते हे तत्व मानणारे आहोत तर सरकार सत्तामेव जयते मानते. सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकशाहीसाठी काळा दिवस


जयंत पाटील यांचे निलंबन लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटक सरकार कुरघोडी करत असताना आपले सरकार काहीच करत नसल्याचा खेददेखील त्यांनी व्यक्त केला.