संतापजनक! अत्याचार करून भावी पत्नीचा खून

0

कुटुंब खरेदीत व्यस्त असताना चिरला गाळा

जालना. घरात लग्नकार्य असल्याने दोन्ही कुटुंबं आनंदात होती. दोन्हीकडील मंडळी लग्नबस्ता खरेदीसाठी जाताच नवरोबा थेट भावी नवरीच्या घरी गेला. तिच्याकडे नको ती मागणी केली. तिने विरोध केल्याने बळजबरीने अत्याचार केल्यानंतर गळा चिरून तिचा खूनही केला (Murder of future wife by accused). ही घटना उघडकीस आल्याने जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दीप्ती उर्फ सपना जाधव असे मृत तरुणीचे नाव आहे. जालन्याच्या मंठा तालुक्यातील बेलोरा (Belora in Mantha Taluka of Jalana) गावात शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. आरोपी नवरोबा घटनेपासून फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. घटनेमागील नेमके कारणही अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आरोपी गजाआड झाल्यानंतरह नेमके रहस्य पुढे येऊ शकेल.

महिनाभरावर होते लग्न

बेलोरा गावातील रहिवासी दीप्तीचे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील सुभाष पवार या तरुणासोबत जुळले होते. १७ मार्चला दोघेही विवाहबंधनात अडकणार होते. शनिवारी वधू आणि वर पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेले होते. आरोपी सुशीलही बस्त्यासाठी नातेवाइकांसोबत आला होता. मात्र, तो अचानक गायब झाला. त्याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला.

गावात तणाव

माहिती मिळताच परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, सेवली ठाण्याचे सहायक निरीक्षक नित्यानंद उबाळे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. घटनास्थळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मारेकरी सुशील पवार यास अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने संशयित तरुणाच्या आईवडिलांसह नातेवाइकांना बेलोरा येथील एका घरात कोंडले होते. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.