शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली नाराजी

0

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली नाराजी

पुणे. अवघ्या महाराष्ट्रात शिव जयंतीचा जल्लोष दिसून येतो आहे. शासकीय मुख्य सोहळा किल्ले शिवनेरीवर रंगला. राज्यपाल सुरेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Governor Suresh Bais, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis) शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort ) उपस्थित होते.त्याचवेळी गर्दीत उभे असलेले संभाजीराजे छत्रपतींनी शिवभक्तांच्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित करीत जाहीर नाराजी व्यक्त केली. किल्ले शिवनेरीवर आलेल्या शिवभक्तांना व्हीआयपी कल्चरमुळे डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. . शिवनेरी किल्ला छोटा आहे, मी इथून पुढे गेलो तर शिवजन्मस्थळाच्या दर्शनासाठी ताटकळत असलेल्या शिवभक्तांमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते. मीदेखील दर्शन मिळेपर्यंत त्यांच्यासोबत रांगेत उभा राहीन, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
संभाजीराजे म्हणाले की, शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रम जरुर करावा, पण दुजाभाव करु नये. शिवभक्तांना वर किल्ल्यावर आणायचे आणि दर्शन घेऊन द्यायचे नाही, हे चूक आहे. दरवर्षी हेच होते, आम्ही आणखी किती सहन करायचे. शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून काही व्यक्तींना पर्सनल पासेस देण्यात आले. मात्र, शिवभक्तांना प्रवेश दिला जात नाही. हा कुठला न्याय झाला, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उभे राहून शांतपणे संभाजीराजे यांचे म्हणणे ऐकून घेत होते. आयोजकांनी संभाजीराजे छत्रपती यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

नेते, पुढाऱ्यांनीही चालत यावे
विनंती करूनही संभाजीराजेंनी व्यासपीठावर जाणे टाळले शेवटपर्यंत शिवभक्तांच्या गर्दीत उभे राहिले. आयोजकांनी मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले होते, असा उल्लेख केला. त्यावर संभाजीराजेंचा अधिकच भडका दिसला. हेलिकॉप्टरचा विषयच येत नाही. मी केवळ एकावेळचा अपवाद वगळता शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांसोबत दरवर्षी चालत येतो. आम्ही राष्ट्रपतींनाही किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर उतरवून दिलेले नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास समजवून घ्यायचा असेल तर नेत्यांनी-पुढाऱ्यांनीही किल्ल्यावर चालतच आले पाहिजे, असे ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा