पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

0

इस्लामाबाद :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून पाकिस्तानी रेंजर्स म्हणजेच निमलष्करी दलाकडून नाट्यमय अटक करण्यात आली. इम्रान खान हे न्यायालयात जात असतानाच त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकण्यात आले. ( Imran Khan Arrest). इम्रान खान हे दोन प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,इम्रान खान उच्च न्यायालयात दाखल होताच निमलष्करी दल आणि सशस्त्र पथकेही उच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायालयाचे दार चिलखती वाहनांनी अडवण्यात आले आणि काही वेळातच इम्रान यांना पकडून बाहेर आणण्यात आले. या अटकेमुळे पाकिस्तानात तणाव पसरला असून अनेक ठिकाणी जाळपोळ सुरु असल्याीच माहिती आहे.
वजिराबादमध्ये आपल्याला ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इंटेलिजन्सच्या उच्च अधिकार्‍यांवर केला होता. या आरोपांमुळे पाकिस्तानी लष्कर खवळले असून लष्कराने हे आरोप फेटाळून लावले. इम्रान खान यांनी आज एक व्हिडिओ जारी करून आरोपांची पुनरावृत्ती केली. यानंतर काही तासांतच त्यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली.
या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह मंत्रालयाचे सचिव आणि इस्लामाबादचे पोलीस प्रमुख यांना अटक केल्यानंतर 15 मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती फारुख म्हणाले की, पोलीस प्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत, तर आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावू. इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली?, अशी विचारणा न्यायालयाने केली.
अल कादिर ट्रस्ट प्रकरण
दरम्यान, इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती आहे. पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली होती. या प्रकरणाचा खुलासा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मलिक रियाझ यांनी केला आहे.