“या प्रसंगांमध्ये विरोधकांना बहिष्कार का आठवला नाही?..”: फडणवीस
मुंबई : काँग्रेससह काही विरोधी पक्ष संसदेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भाषा करीत आहेत, त्यांचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही. संसद ही केवळ एक इमारत नाही, तर 140 कोटी देशवासियांच्या आस्थेचे मंदिर आहे, असे सांगतानाच यापूर्वीची अशी अनेक उदाहरणे सांगत त्यावेळी बहिष्कार का आठवला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis on opposition boycott on Parliament Building Inauguration) यांनी आज विरोधकांना उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवीन संसद ही नव्या भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे. अवघ्या 3 ते 4 वर्षांत ही वास्तु तयार झाली आहे. नेहरुंनी कर्नाटक विधानसभेचे भूमिपूजन केले, तेव्हा बहिष्काराचा विषय का आला नाही, किंवा इंदिरा गांधींनी संसदेच्या अॅनेक्स इमारतीचे उदघाटन केले, इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्र विधानभवनाचे उदघाटन केले, राजीव गांधी यांनी संसदेच्या वाचनालयाचे उदघाटन केले, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बिहार विधानसभेतील सेंट्रल हॉलचे उदघाटन केले, तेव्हा का बहिष्कार आठवला नाही? मणिपूरमधील नवीन विधानसभेचे उदघाटन तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. तत्कालिन मुख्यमंत्री होते. पण, राज्यपालांना साधे निमंत्रण सुद्धा दिले गेले नाही. आसाम विधानसभेचे भूमिपूजन तरुण गोगोई यांनी केले, पण राज्यपालांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. 2018 मध्ये आंध्र विधानसभेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, राज्यपालांना निमंत्रण देण्यात आले नाही. 2020 मध्ये कुठल्याही संवैधानिक पदावर नसताना सोनिया गांधी यांनी छत्तीसगड विधानसभेचे भूमिपूजन केले, त्यात तर राहुल गांधी हेही प्रमुख पाहुणे होते, मग तेव्हा बहिष्कार का आठवला नाही? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी विधानसभेच्या प्लॅटिनम ज्युबली मेमोरियल बिल्डींगचे उदघाटन केले, तेव्हा बहिष्काराचे अस्त्र का उगारले नाही? दिल्ली विधानसभेच्या रिसर्च सेंटरचे उदघाटन केजरीवाल यांनी केले किंवा तेलंगणामध्ये विधानभवनाचे उदघाटन केसीआर यांनी केले, या सर्व प्रसंगांत विरोधकांना बहिष्कार का आठवला नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
विरोधकांनी जे केले ते लोकशाहीवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदेचे उदघाटन करणार असतील तर मग पोटशूळ का? विरोधक हे खुर्चीचे व्यापारी आहेत. सत्ता आणि खुर्चीच्या लोभाने हे विरोधक एकत्र येतात. विरोधकांकडे नेता, नीती आणि नियत तिन्ही नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.