प्रवासी खाली उतरले आणि बसने पेट घेतला; नाशिकमध्ये मोठी दुर्घटना टळली

0

नाशिकच्या नांदगाव बसस्थानकात उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील चालक – वाहकासह सर्व प्रवासी हे खाली उतरलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाशिकच्या नांदगाव बस स्थानकात हा प्रकार घडला. बस मधून धूर येत होता. यामुळे वाहक आणि चालकाने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले.  आजूबाजूला उभ्या असलेल्या बस प्रसंगावधान राखत सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या. तसेच प्रवाशांना तात्काळ बाजूला हलविण्यात आल्याने इतर नुकसान टळले. दरम्यान, बसला आग लागली तेव्हा आग थोड्या प्रमाणात होती मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्याची साधनसामुग्री वेळेत उपलब्ध न झाल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. बॅटरीच्या शॉर्ट सर्किट झाल्याने बस पेटली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

नाशिकमधील राहुड घाटात शहादा-नाशिक बसने पेट घेतला

नाशिकमधील राहुड घाटात शहादा-नाशिक बसने पेट घेतला होता. बसमधून सुरुवातीला धूर निघाला नंतर बसच पेटली. ड्रायव्हरच्या प्रसंगवधनामुळे मोठा अनर्थ मात्र टळला. ड्रायव्हरने वेळीच बसमधल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवलं यामुळ सर्व प्रवासी बचावले आहेत.

वणी गडावर जाणा-या एसटीच्या बसला आग

नाशिकमध्ये वणी गडावर जाणा-या एसटीच्या बसला आग लागली होती. गडावर कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव असतो. त्यामुळे गडावर भाविकांची मोठी गर्दी होती. यात्रेसाठी बनविलेल्या तात्पुरत्या बस स्थानकावरील शॉर्ट सर्किटमुळे बसने पेट घेतला होता. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले होते. बस पेटली त्यावेळी बस प्रवाशांनी फुल्ल भरली होती. सुदैवाने प्रवाशी खाली उतरल्याने मोठी जिवीत हानी टळली. स्थानिकांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. या आगीत बसचा पुढील भाग जळून खाक झाली.