पटोलेंनी राजीनामा देताना कोणाला विश्वासात घेतले नाही, छगन भुजबळांचीही टीका

0

नाशिकः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही उघडपणे टीका केली आहे. भुजबळ म्हणाले की, पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना कोणाला (NCP Leader Chhagan Bhujbal on Nana Patole) विश्वासात घेतले नाही व पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होऊ शकला नाही. त्यानंतरच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असेही भुजबळ म्हणाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुरुवातीला पटोलेंवर या मुद्यावरून टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांनीही याबद्धल पटोलेंच्या भूमिकेवर टीका केली आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरु असलेल्या वादातून हा विषय पुढे आलाय.

नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील वादातून थोरातांनी महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. हे प्रकरण आता दिल्ली दरबारी आहे. थोरात-पटोले वादात शिवसेनेने थोरातांची बाजू घेतली आहे. बाळासाहेब थोरात हे अनुभवी नेते आहेत. पटोले यांनी हा वाद मिटवावा असे आवाहन करताना पटोलेंनी मविआ सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर उद्धव सरकार कोसळले नसते, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली होती. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाना पटोले यांना घरचा आहेर दिला आहे. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे पुढील पेच उद्भवला, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली होती. तर यशोमती ठाकूर यांनीही त्यात सहमती दर्शविताना नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकले असते, असा दावा केलाय.