पवार भाजपासोबत…!

0

प्रकाश आंबेडकर म्हणतात,

नागपूरः शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होताच महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) जवळ करण्यास स्पष्ट नकार दिल्याने नाराज झालेल्या आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर आगपाखड केली. “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत” या आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि वंचित आघाडीतही चारच दिवसांत ठिणगी पडली असून खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी त्यांना ‘अशा प्रकारची वक्तव्ये करू नका’ असा सल्ला दिलाय. “आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांबाबत अशी वक्तव्ये करणे आम्हाला अजिबात मान्य नाही. विशेषतः पवारांवरील आरोप आम्हाला मान्य नाही. त्यांनी शब्दांचा जपून वापर करावा” असा सल्ला त्यांनी आंबेडकरांना दिलाय.

राजकीय जाणकारांनुसार, प्रकाश आंबेडकर यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती करण्यात कुठलेच स्वारस्य नव्हते. मात्र, महाविकास आघाडीत प्रवेश मिळविण्यासाठी ठाकरे गट हे एक माध्यम ठरु शकते, या भूमिकेतून आंबेडकरांनी ठाकरे गटाशी युती करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे चार दिवसांपूर्वी युतीची घोषणा देखील झाली. मात्र, वंचित बहुजन आघाडीला आघाडीत वाटा देण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची तयारी नाही. दोन्ही पक्षांनी आता स्पष्टपणे तसे सांगितले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर अस्वस्थ झाले आहेत. मविआत प्रवेश मिळणे शक्य होत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी शरद पवारांवर आगपाखड केली. पहाटेच्या शपथविधीचा धागा पकडून शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत, असा टोला त्यांनी पवारांना लगावला. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गोटात अस्वस्थता पसरली आहे. अलिकडेच नाना पटोले यांनीही वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीशी संबंध नाही, असे स्पष्टच सांगून या विषयाला पूर्णविराम दिलाय.

“आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांबाबत अशी वक्तव्ये करणे आम्हाला अजिबात मान्य नाही. विशेषतः पवारांवरील आरोप आम्हाला मान्य नाही. त्यांनी शब्दांचा जपून वापर करावा” असा सल्ला संजय राऊतांनी आंबेडकरांना दिलाय. पवारांवर असे आरोप करणे म्हणजे त्यांच्या कारकीर्दीवर आरोप करण्यासारखे आहे. ते भाजपचे असते तर अडीच वर्षापूर्वी भाजपचे सरकार दूर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येऊच दिले नसते, असा युक्तिवाद राऊतांनी केलाय. पवारांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला व आजही विरोधकांच्या एकीचा विचार करतो, तेव्हा पवारांचे नाव प्रामुख्याने घेतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मी राहुल गांधीशी बोललो-राऊत
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीशी संबंध नाही, असे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांनाही राऊत यांनी उत्तर दिले. माझे राहुल गांधी यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले आहे, असे सांगत राऊत यांनी पटोलेंना आपण मोजत नसल्याचे दाखवून दिले.

 

 

पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread | Shankhnaad khadyayatra