बुधवारपासून होते बेपत्ता : चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील घटना
चंद्रपूर. तीन वर्गमित्र बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता (Three classmates were missing since Wednesday) होते. पालकांनी तक्रार दिल्यानंतर गडचांदूर पोलिसांकडून (Gadchandur Police) शोध सुरू झाला. ते शाळा सुटल्यावर पोहोयला जाणार असल्याची कुजबूड सुरू झाली. याबाबत माहिती मिळताच त्यानंतर संबंधित ठिकाणी शोधमोहीम सुरू होती. पण, यश मिळत नव्हते. नेमकी स्थिती स्पष्ट नसल्याने साऱ्यांच्याच जीवाला घोर लागला होता. शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यात तिन्ही मुलांचे मृतदेहच हाती लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात (Korpana Taluka of Chandrapur District ) ही दुर्दैवी घटना घडली. अल्ट्राटेक परिसरातील एका डबक्यातून तिन्ही जीवलग मित्रांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उपस्थित कुटुंबियांनी हंबरडा फोडला. मुले गमावलेल्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
पारस गौरदीपे, अर्जुन सिंग, दर्शन बच्चाशंकर अशी एकत्र जगाचा निरोप घेणाऱ्या जिवलग मित्रांची नावे आहेत. तिघेही १० वर्षे वयोगटातील आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आधल्या दिवशी बुधवारी त्यांच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवसभर आनंदात घालविला, सोबतच शाळा सुटल्यानंतर अल्ट्राटेक परिसरातील डबक्यात पोहोण्यासाठी जाण्याचा बेत आखला होता. ठरल्याप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तिघेही थेट डबक्याच्या दिशेने निघाले. तेव्हापासून ते बेपत्ताच होते.
ग्रामस्थांची भीती खरी ठरली
ही मुले डबक्यात पोहण्यासाठी उतरली असावी आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत होता. ही कुणकुण पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचली. त्यानुसार पोलिसांनी ही मुले पोहायला गेली होती तिथे शोध सुरू केला. घटनास्थळावर मुलांचे कपडे व अन्य साहित्य सापडले होते. त्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. बुधवारी संध्याकाळपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. मात्र, अंधार झाल्याने बचाव कार्य थांबवावे लागले होते. आज पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. पथकातील सदस्यांना तिन्ही मित्रांचे मृतदेहच हाती लागले.