
“थर्मल चंद्रपूरची ओळख महाराष्ट्रभर पोहोचवणारा ऐतिहासिक क्षण – सुधीरभाऊ मुनगंटिवार
चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या चंद्रपूर फोटो व्हिडिओ एक्स्पो 2025 चे भव्य व दिमाखदार उद्घाटन आज दि. 18 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटिवार यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटनानंतर मा. सुधीरभाऊ मुनगंटिवार यांनी एक्स्पोमधील सर्व स्टॉल्सना भेट देत अत्याधुनिक कॅमेरे, नव्या पिढीचे उपकरणे व फोटोग्राफी-व्हिडिओग्राफीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो फोटोग्राफर बांधवांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे एक्स्पोचा सभागृह अक्षरशः अपुरा पडला, हे या ऐतिहासिक आयोजनाचे मोठे यश ठरले.
यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. मा. सुधीरभाऊ यांचे स्वागत कॅव्होक सर्व्हिसचे मालक मा. श्री. सुमित जैन, TDUC चे संस्थापक प्रीतम खोब्रागडे, अध्यक्ष गणेश साळवे व देवा बुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी TDUC – फोटोग्राफर संस्था, चंद्रपूर या नावाचे अधिकृत विमोचन मा. सुधीरभाऊ मुनगंटिवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Thermal हा शब्द चंद्रपूर जिल्ह्याची ओळख दर्शवणारा असून, संपूर्ण महाराष्ट्रातील फोटोग्राफर बांधवांना एकत्र आणून संघटित करत आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक योगदान देणे, हाच TDUC चा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याच कार्यक्रमात TDUC च्या वतीने विशेष परिश्रमातून तयार करण्यात आलेल्या ‘चंद्रपूरच्या वैभवशाली इतिहासावर आधारित विशेष मॅगझिन’चे भव्य विमोचन मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटिवार यांच्या शुभहस्ते अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. चंद्रपूरातील ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा व समृद्ध इतिहास यांची सविस्तर माहिती या मॅगझिनमध्ये समाविष्ट असून, एक्स्पोला उपस्थित प्रत्येक फोटोग्राफर बांधवाला ही मॅगझिन सप्रेम भेट म्हणून प्रदान करण्यात आली.
या मॅगझिनच्या माध्यमातून चंद्रपूरचा गौरवशाली इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावा, अधिकाधिक नागरिक व पर्यटकांनी चंद्रपूरच्या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यावी, हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. चंद्रपूरची संस्कृती, इतिहास व वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद असून, तो चंद्रपूरच्या ओळखीला नवी उंची देणारा ठरणार आहे.
तसेच, चंद्रपूर फोटो व्हिडिओ एक्स्पो २०२५ दरम्यान फोटोग्राफर बांधवांच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यासाठी विविध विशेष कार्यशाळांचे (Workshops) आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळांमध्ये फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षेत्रातील नामवंत, अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांची उपस्थिती लाभली.या कार्यशाळांचे मार्गदर्शन कुशाल सोनी सर,अमोल उरकुडे,अमोल ढगे,इम्रान शेख,मोहित सावरे या मान्यवर प्रशिक्षकांनी केले.त्यांनी आपल्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष कामातील उपयुक्त टिप्स आणि बदलत्या फोटोग्राफी विश्वातील नवे आयाम प्रभावीपणे मांडले. त्यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे उपस्थित सर्व फोटोग्राफर मंत्रमुग्ध झाले असून, त्यांच्या व्यावसायिक ज्ञानात व कौशल्यात लक्षणीय वाढ झाली.
या कार्यशाळा फोटोग्राफरांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरल्या, हे निश्चितच उल्लेखनीय हे.कार्यक्रमाच्या शेवटी मा. सुधीरभाऊ मुनगंटिवार यांनी आपल्या प्रेरणादायी व मनमोहक भाषणातून सर्व फोटोग्राफर बांधवांना नवी ऊर्जा दिली. त्यांनी TDUC च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, चंद्रपूर जिल्ह्याचे नाव कला, संस्कृती व सर्जनशीलतेच्या माध्यमातून सातत्याने गौरवात राहो, अशी आशा व्यक्त केली.
यावेळी रमेश तांडी, अमूल कोत्रिवार, नितेश ढुमणे, विजू ढाले, राकेश मस्के,आनंद निरबावणे, राजेश नाकडे, राज सोनारे, रेणू साखरे, आकाश सिंग, आशिष डोनाडकर, सूर्यकांत मोरे, यांच्यासह अनेक मान्यवर व फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर फोटो व्हिडिओ एक्स्पो 2025 हा केवळ एक एक्स्पो न राहता, चंद्रपूरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व कलात्मक ओळखीला नवे परिमाण देणारा ऐतिहासिक सोहळा ठरला आहे.















