भिवानी- अयोध्या येथील रामजन्मभूमीवरील श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात मोठ्या संख्येने आयोजन झाले. मोठ्या संख्येने रामभक्त या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. अशातच सोमवारी सोमवारी हरियाणातील भिवानी येथे मंचावर रामलिला सुरु असतानाच हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा श्रीरामाच्या चरणी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कलाकाराचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असावा, असे डॉक्टारांचे म्हणणे आहे.
मंचावर मृत्यू झालेल्या कलाकाराचे नाव हरीष मेहता आहे. हरीश मेहता हे वीज विभागातून जेई या पदावरून निवृत्त झाले होते. मागील २५ वर्षांपासून ते रामलिलांमध्ये हनुमानाची भूमिका साकार करायचे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने काल रामलिलेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हरीष मेहता हे पुन्हा एकदा हनुमानाच्या भूमिकेत होते. अचानक अभिनयाच्या दरम्यान ते अचानक श्रीरामाच्या भूमिकेत असलेल्या मुलाच्या पाया पडले. उपस्थितांना ते अभिनय करीत असल्याचे वाटले व सारे जण टाळ्या वाजवत होते. पण बराच वेळ त्यांच्या शरीराची काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यावर उपस्थितांना शंका आली. त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला असता ते काहीच हालचाल करीत नसल्याचे लक्षात आले. त्यांची नाडी तपासण्यात आल्यावर ती सुरु नसल्याचे लक्षात आल्याने त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.