चित्त्यांचे वास्तव्य असलेल्या कुनो पार्कमध्ये पुन्हा गुडन्यूज!

0

कुनो- देशातून अनेक दशकांपूर्वी नामशेष झालेल्या चित्त्यांचे मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये पुन्हा एकदा संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नामिबियातून चित्ते आणले गेले होते. आता कुनोमधून पुन्हा एकदा गुडन्यूज आली आहे. यातील चित्त्याने तीन शावकांना जन्म दिलाय. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिलीय. शावकांना जन्म देणाऱ्या मादी चित्त्याचे नाव ज्वाला असे आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या महिनाभरात आतापर्यंत ६ शावक जन्माला आली आहेत.
कुनो नॅशनल पार्कच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार शावकांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांची पार्क प्रशासनाकडूनही काळजी घेतली जात आहे. ३ जानेवारी रोजी दिवसांपूर्वी मादी चित्ता आशा हिनेही ३ पिल्लांना जन्म दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मार्च २०२३ मध्ये मादी चित्ता ज्वालाने चार शावकांना जन्म दिला होता. मात्र यातील एकच शावक जिवंत राहू शकले. त्यानंतर कुनो व्यवस्थापनाने शावकांच्या मृत्यूचे कारण तीव्र उष्णता असल्याचे सांगितले होते. ज्वाला ही पूर्वी शिया नावाने ओळखली जात होती, नंतर तिचे नाव ‘ज्वाला’ ठेवण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व चित्ते निरोगी असून पार्कची टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये आता हळूहळू चित्त्यांची संख्या वाढत आहे.