दिल्लीतील राजकीय वातावरण तापले
दिल्ली. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi ) यांच्या घरी दिल्ली पोलिस पोहोचले. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले (political atmosphere in Delhi heated up) आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महिलांनी आपल्याकडे येऊन बलात्काराच्या घटनांना वाचा फोडल्याचा दावा केला होता. याच बलात्कार पीडितांवरील वक्तव्यावर चौकशीसाठी दिल्ली पोलिस (Delhi Police ) गांधींच्या घरी पोहोचले होते. विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांना राहुल गांधी यांची भेट घेतली. तब्बल दोन तास त्यांच्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरे दिली. भेटीनंतर विशेष पोलिस आयुक्तांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माहिती मागितली. राहुल यांनी थोडा वेळ मागितला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटले. त्यानंतर त्यांनी ते वक्तव्य केले होते. सर्व माहिती जोडायला थोडा वेळ लाग असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले असल्याचे हुड्डा म्हणाले. आवश्यकता असल्यास आम्ही राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी करू, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दक्षिणेतून काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती. यादरम्यान ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये आयोजित सभेत त्यांनी केंद्र सरकारवर निशाना साधताना गंभीर स्वरुपाचे वक्तव्ये केली होती. यात्रे दरम्यान अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या, त्या रडत होत्या, खूप दुःखी होत्या. त्यापैकी काही महिला म्हणाल्या की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचं लैंगिक शोषण झाले आहे. मी त्यांना म्हणालो की, मी पोलिसांना याबद्दल सांगू का. त्यावर त्या महिला म्हणाल्या की, राहुलजी ही गोष्ट आम्हाला केवळ तुम्हाला सांगायची होती. पोलिसांना याबद्दल सांगू नका. अन्यथा आम्हाला अधिक नुकसान सहन करावे लागेल. याच वक्तव्याबाबच चौकशीसाठी पोलिसांचं एक पथक १५ मार्चलासुद्धा राहुल गांधी यांच्या घरी गेलं होते. पथकाने तीन तास वाट पाहिली. परंतु राहुल भेटले नाहीत. १६ मार्च रोजी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी पुन्हा एकदा राहुल यांच्या घरी गेले. त्यांनीदेखील दीड तास वाट पाहिली. त्यानंतर राहुल यांच्याशी पोलिस अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यानंतर राहुल यांनी नोटीस स्वीकारली. त्यानंतर काँग्रेसने योग्य वेळी कायदेशीर पद्धतीने नोटीशीचे उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या घडामोडीनंतर काँग्रेसनेत्यांकडून संताप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, दिल्ली पोलिसांना महिलांची इतकी काळजी आहे तर ते फेब्रुवारी महिन्यात राहुल यांच्याकडे का गेले नाहीत. भारत जोडो यात्रा संपून ४५ दिवसांनंतर चौकशी केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.