पवारांची राजकीय निवृत्ती

0

 

-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9882162248

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  NCP संस्थापक आणि देशातील प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे खा. शरद पवार  sharad pawar यांनी परवा कार्यकर्त्यांना धक्का देत राजकीय जीवनातून आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. ” लोक माझे सांगाती ” या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात त्यांनी अचानक ही घोषणा केल्याचा उपस्थित सर्वाना धक्का बसला. पवारांनी जाहीर केलेला निर्णय इतरांसाठी धक्का असला तरी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना त्याची जाणीव होती असे दिसते. त्यांच्या पत्नी,मुलगी आणि पुतण्या अजित पवार यांच्या देहबोलीतून ते प्रकट झालेले दिसले. अनेकांनी चव्हाण प्रतिष्ठान मध्ये जो आकांडतांडव सुरु केला त्याला थांबवताना अजित पवार ज्या पद्धतीने वागले त्यावरून असा निर्णय काका घेणार असल्याची त्यांना माहिती होती. आज ना उद्या हे होणारच होते असेही अजित पवार म्हणाले यावरून शरद पवारानी किमान कुटुंबाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतल्याचे दिसते.

आजच्या घडीला पवारांचे वय ऎशीच्या घरात आहे शिवाय त्यांची प्रकृती अलीकडे त्यांना साथ देत नाही तरीही पवार सतत राज्यभर फिरत असतात घरी असले तरी विविध लोकांच्या भेट घेणे त्यांचे सुरु असते. पायाला आणि विचारांना सतत गतीची चक्रे बांधून या नेत्याने देशभरात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. असे असले तरी शेवटच्या घटकेपर्यंत पदाला चिकटून बसणाऱ्या नेत्यांपैकी पवार नाहीत ,ज्येष्ठांनी एक दिवस सन्मानाने बाजूला होऊन नेतृत्वाची सूत्रे आगामी पिढ्यांच्या हातात सोपवली पाहिजेत असा विचार करणाऱ्या फारच मोजक्या नेत्यांमध्ये पवार यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे पवारांनी घेतलेला निर्णय समयोचित आणि अतिशय योग्य आहे. ज्यांना पवारांशिवाय पक्षात पुढे सगळा अंधार दिसतो त्यांनी खरंतर एवढी वर्ष राजकारणात राहून काहीही साध्य केलेले दिसत नाही.अश्या सगळ्या परावलंबी लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

आपल्या राजकारणात घराणेशाही आणि काही ठराविक आडनावांना फारच क्रेझ आहे. काँग्रेस पक्षात गांधी शिवाय काहीही होत नाही तसेच गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीत पवारांच्या शिवाय काहीही होणार नाही असे मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. शरद पवार यांचा अफाट अभ्यास,आवाका,जनसंपर्क ,प्रशासनाचा अनुभव,लोकांना ओळखण्याची हातोटी ,कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याची कला आणि सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा वास्तव सहकार याना कुणीही नाकारणार नाही. शरद पवार हे नाव जरी उच्चारले तरी धडकी भरावी असा देशभर दरारा निर्माण करणाऱ्या पवारांनी कधीच आतासारखे सवंग राजकारण केले नाही. एक सुसंस्कृत नेता अशीच त्यांची प्रतिमा देशभरात कायम आहे. काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन देशभर मोजकी पण मजबूत ताकद निर्माण करणाऱ्या पवारांनी अतिशय विवेकाने स्वतःचे राजकारण केले.

१० जून १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर पवार त्याचे आजतागायत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सतत लोकशाहीचा जयघोष करताना एवढी वर्ष तुम्हीच कसे अध्यक्ष ? असा प्रश्न कुणीतरी विचारलाच असेल , समजा विचारलाही नसेल तरी लोकशाहीवादी नेत्याला असे आपणच त्या पदावर तहहयात बसणे नक्कीच योग्य वाटले नसावे. गेल्या २५ वर्षात देशाच्या राजकारणाचे सगळे संदर्भ बदलले आहेत. राजकीय तडजोडी करीत पुढे जाणे हा एकच पर्याय आताच्या राजकीय व्यवस्थेत उरला असताना या पक्षाला सुद्धा नव्या तडजोडी करण्याची मानसिकता निर्माण करावी लागेल ,नव्या लोकांना महत्वाच्या पदांवर संधी द्यावी लागेल . काही ठराविक चेहरे आगामी काळात बाजूला करावे लागतील ,कदाचित त्यासाठीच पवार या पदावरून बाजूला झाले असतील ,बदलाची सुरुवात त्यांच्या या निवृत्ती मधून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एका बाजूला पवारांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात असला तरी त्यांना बेभरवशाचा नेता मानणारे सुद्धा कमी नाहीत. त्यांनी कधीही आरोप सिद्ध होतील असे पुरावे मागे ठेवले नाहीत तरीही पवार जे बोलतात ते करीत नसतात असे का म्हटले जाते याचे उत्तर मिळत नाही. पवार एकाच वेळी असंख्य आघाड्यांवर खेळत असता. ते मोदींचे मित्र असतात आणि गौतम अडाणी बाबत सहानुभूतीचा विचार करतात. महाविकास आघाडी ज्यावर आपले टोक धारदार करते तेच टोक बोथट करण्याचे कामही पवार करतात त्यामुळे त्यांच्या स्वभावाचा थांग कधी लागत नाही ,म्हणूनच पवार यांच्या राजकारणावर अविश्वास दाखविणारा वर्ग तयार झाला असावा. परवा त्यांनी घेतलेला निर्णय काळ सुसंगत असा आहे त्यामुळे उगीच साहेब परत या अश्या घोषणा देण्यात काहीच अर्थ नाही ,राजकारण सोडले असले तरी आपण सामाजिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचे त्यांचे विधान बरेसचे सांगून जाणारे आहे.