नागपूर : घटनेच्या परिशिष्ट १० आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदे गटाने केलेली बंडखोरी हा पक्षद्रोहच आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली. ‘मातोश्री’ वर ताबा मिळविण्याचे त्यांचे दिवास्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असा इशाराही दिला.
पक्षांतर विरोधी कायद्यामुळे पूर्वी एकट्याने होणारे पक्षांतर हल्ली एकत्रितपणे होऊ लागले. म्हणून, २००३ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामूहिक पक्षांतरालाही घटनाबाह्य घोषित केले गेले. हे लक्षात घेता शिंदेंनी पक्षद्रोह केला असा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत केला.
एक म्हणजे शिंदेंनी स्वेच्छेने पक्ष सोडला. दुसरे म्हणजे कायद्यानुसार पक्ष सोडल्या नंतर सोडणाऱ्यांना स्वत:चा स्वतंत्र गट तयार करता येत नाही. त्यांना दुसऱ्या पक्षात विलिन व्हावे लागते. यापैकी काहीही शिंदे गटाने केलेले नाही. शिवाय ते एकाच वेळी बाहेर पडले नाही. तर गटागटाने निघाले याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही.
निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाचा विचार करीत भाजपाच्या संहितेनुसार निर्णय दिला. या प्रकरणी निवडणूक आयोग घटनाबाह्य वागले असा आरोप सावंत यांनी केला.
शिवसेनेने १२४ जागा लढवल्या. त्यापैकी ५५ जागा निवडून आल्या. आताच्या बंडखोरांसह संपूर्ण १२४ जण शिवसेनेचा एबी फार्म आणि पक्षचिन्हावर लढले. मग पराभूत झालेल्यांची मते कोणाची होती, असा सवाल सावंत यांनी केला. सीबीआय, ईडी, आयकर खाते या प्रमाणे निवडणूक आयोगही आता विकाऊ झालेला आहे असा आरोप सावंत यांनी केला. आज कोणालाच कशाची चाड नाही. निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक लगेच राज्यसभा वा निवडणूक आयोगावर होते यातच सर्व आले .