प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 11 डिसेंबर रोजी रविवारी विविध कार्यक्रमांसाठी नागपुरात येत आहेत. समृद्धी महा मार्ग, वंदे भारत, एम्स लोकार्पणासोबतच हजारो कोटींच्या योजनांचा शुभारंभ पंतप्रधान करणार आहेत. या दौऱ्यासाठी नागपूरचे मध्यवर्ती रेल्वेस्टेशन, मेट्रो स्टेशन्स सजले असून शहर सज्ज झाले आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याने पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेक केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, खासदार,आमदार आदी अनेक अति महत्वाच्या व्यक्तींचे शहरात आगमन होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते फ्रीडम पार्कला भेट देतील. यंदा भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यांनतर मेट्रोने कस्तुरचंद पार्क ते खापरी प्रवास करतील. समृद्धी मार्गाची पाहणी केल्यानंतर एम्सला भेट, संवाद साधल्यानंतर जाहीर सभेच्या निमित्ताने अजनी रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पासह नागनदी पुनरुज्जीवन आणि विविध प्रकल्प उदघाटन, भूमी पूजन करतील. पंतप्रधानांचा अधिकृत दौरा आज येणार असला तरी तीन- साडेतीन तासांच्या त्यांच्या नागपूर दौऱ्याच्या दृष्टीने शहरातील विविध मार्गावर सुरक्षात्मक खबरदारी आणि वाहतूकीचे दृष्टीने विविध ठिकाणी बैरीकेडींग करून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. आवश्यक वाहतूकीवर निर्बंध घालण्याकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर गर्दी राहणार असल्याने या मार्गावर सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. नागपूर रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी प्रवाश्यांनी संत्रा मार्केट मार्गाचा वापर करावा. अमरावती मार्गे वर्धा करिता व जबलपूर मार्गे अमरावतीकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी झिरो पॉईन्ट ते समृद्धी महामार्ग (वायफळ टोल प्लाझा) हिंगणा गावाकडून झिरो पॉईन्टकडे येणारा मार्ग संपूर्ण वाहतूकीस बंद राहील.
अमरावती मार्गावरून वर्धेकडे जाणारी वाहतूक ही मोंढा फाटा येथून उजवे वळण घेवून कान्होलीबारा मार्गे बुटीबोरीमार्गे वळविण्यात आली आहे.
दरम्यान, अमरावती मार्गे जबलपूर जाणारी वाहतूक व भंडारा मार्गे वर्धा, अमरावतीकडे जाणारी वाहतूक पारडी चौक, अॅटोमोटीव्ह चौक, मानकापूर चौक, नवीन काटोलनाका चौक, दामा टी पॉईन्ट, वाडी टी पॉईन्ट, अमरावती रोड या मार्गाचा वापर करता येईल.वर्धा मार्गे नागपूर शहरात येणारी वाहतूक ही बुटीबोरी येथून वळविण्यात आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची रंगीत तालीमही करण्यात आली. आवश्यक बदल सुचविण्यात आले.