चंडिगडः पोलिस यंत्रणेसाठी डोकेदुखी होऊन बसलेला खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग (Khalistan Supporter Amritpal Singh arrested) विरोधात शनिवारी पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी अजनाला पोलिस ठाण्यावरील हल्लाप्रकरणी अमृतपालच्या 6 सहकाऱ्यांना अटक केली. यावेळी अमृतपाल आपल्या मर्सिडीस कारमधून पळून गेला. पोलिसांनी जवळपास दीड तास पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. जालंधरच्या मैहतपूर भागात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंजाब पोलिसांनी घेराव घालताच अमृतपाल मैहतपूरच्या लिंक रोडमार्गे फरार झाला होता. पंजाब पोलिसांच्या जवळपास 100 गाड्या त्याच्या मागे लागल्या होत्या. अमृतपालच्या अटकेमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी राज्यातील अनेक भागांतील इंटरनेट सेवा रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद केल्या आहेत.
अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ नामक खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख असून त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 2 गुन्हे अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलिस ठाण्यात दाखल आहेत. २३ फेब्रुवारी रोजी पंजाबच्या अजनाला पोलिस ठाण्याच्या हद्दीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्या एका विश्वासू मित्राच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह चक्क अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. याप्रकरणात पंजाब पोलिसांनी चांगलीच फजीती व बदनामी झाली होती. सपशेल नांगी टाकल्यामुळे पंजाब पोलिसांना चौफेर टीकेचा सामना करावा लागला होता. अमृतपालने शनिवारी जालंधर-मोगा नॅशनल हायवेवरील शाहकोट-मसलिंया भागासह भटिंडा जिल्ह्यातील रामपुरा फूल येथे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाहकोट-मसलिया येथील कार्यक्रमासाठी त्याचे शेकडो समर्थक सकाळपासूनच गर्दी करत होते. या कार्यक्रमापूर्वी जालंधर व मोगा पोलिसांनी एका संयुक्त मोहिमेंतर्गत अमृतपालला अटक करण्याची रणनीती आखली होती. यासाठी आसपासच्या अनेक जिल्ह्यांतून रात्रीतूनच पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला होता. जालंधर-मोगा राष्ट्रीय महामार्गावरही सकाळपासूनच नाकेबंदी करण्यात आली होती.
खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अखेर मुसक्या आवळल्या, पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा