नागपूरः भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोटात जे होते, ते आता ओठावर आले आहे. आता तर कुठे सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चागले व्हावे, अशीच आमची सदिच्छा आहे. पण भाजपा त्यांचे काय करेल हे आता सांगता येणार नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State Congress President Nana Patole) यांनी शिंदे यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करताना राज्यातील २८८ पैकी भाजपा २४० जागा लढवण्याचे नियोजन करणार असल्याचा दावा केला होता. बावनकुळे यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. या वक्त्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनीही आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलची खोटी बातमी पसरवण्यात आली. विशेष म्हणजे आमच्यात अशी कोणतीच चर्चा झाली नव्हती. पण चुकीची बातमी पसरवून वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, याप्रकरणात तर स्वत: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज त्यांनी यावरून घुमजावदेखील केला. त्यामुळे जे बावनकुळेंच्या पोटात आहे, तेच त्यांच्या ओठावर आले आहे. शिंदे यांनी हे समजून घेऊन आता सतर्क राहायला हवे, असे पटोले म्हणाले. भाजपा हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. भाजपाकडून सातत्याने लोकांची दिशाभूल करण्यात येते. भाजपाबद्दल आता लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.