

नागपूर (Nagpur), २३ मे २०२६: उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणचे संचालक (संचलन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार यांनी आज नागपूर येथे स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे आयोजित नागपूर परिमंडळाच्या परिपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. ऐन उन्हाळ्यात तांत्रिक बिघाडामुळे होणारे वीज खंडित होण्याचे प्रमाण (Outages) शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे आणि कोणत्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने आपल्या कामात हयगय करू नये, अशी तंबीच त्यांनी यावेळी दिली. माननीय पालकमंत्री नागपूर यांनी दिनांक ४ मे च्या बैठकीत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पने पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना श्री. तालेवार यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही एकाच फीडरवर वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार आता अजिबात सहन केले जाणार नाहीत. वीज पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून यापुढे सर्व प्रकारची देखभाल व दुरुस्तीची कामे अत्यंत काटेकोर आणि पूर्व नियोजनासह (Proper Planning) करण्याचे आदेश त्यांनी दिले. सध्या उन्हाळ्यामुळे यंत्रणेवर विजेचा वाढता ताण पाहता, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात (HQ) उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मानव संसाधन (HR) विभागामार्फत तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली असून, पुढील एक महिना कोणत्याही कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची आकस्मित कारणाशिवाय रजा मंजूर देण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील विजेच्या पायाभूत सुविधांची (Infra Works) कामे गतीने पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही संचालक तालेवार यांनी दिले. वीज पुरवठा सक्षम करण्यासोबतच, मे महिन्यातील वीज बिलांची थकीत रक्कम (Balance Arrears) कमी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आली. वीज बिल वसुलीसाठी कंपनीने एक विशेष आणि सकारात्मक मोहीम आखली आहे. महावितरणच्या या ग्राहककेंद्री प्रयत्नांना नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन थकीत देयके भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच महावितरण तर्फे ग्राहकांना सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ऑनलाईन आलेले अर्ज विहित कालमर्यादेत निकाली काढण्याचे आदेशित करण्यात आले. या आढावा बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, मंगेश वैद्य , दीपाली माडेलवार यांच्यासह परिमंडळातील सर्व कार्यकारी अभियंते आणि नागपूर जिल्ह्यातील उपविभागीय अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते.
















