Home LOCAL NEWS डॉ. अमृता इंदूरकर यांच्या ‘स्मरण काव्यसंचिताचे’चे प्रकाशन

डॉ. अमृता इंदूरकर यांच्या ‘स्मरण काव्यसंचिताचे’चे प्रकाशन

0

नागपूर :(Nagpur) कविता करता येणे, हीच मुळात तरल संवेदनाक्षमतेची प्रचीती देणारी घटना आहे. कविता सृजनाची प्रकिया आत्म संवादाची व्याप्ती दर्शविते. कविता जगता येणे, हाच खरा जीवनानंद आहे, अस् स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित यांनी केले. डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रा. डॉ. अमृता इंदूरकर यांच्या ‘स्मरण काव्यसंचिताचे’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, काव्य समीक्षक डॉ. श्याम धोंड आणि लेखिका डॉ. अमृता इंदूरकर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अपराजित म्हणाले, डॉ. अमृता इंदूरकर यांनी या पुस्तकातून जगण्याच्या विविध निकषांची कवितेच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासाची चिकित्सा केली आहे. ही चिकित्सा करताना त्यांनी अर्वाचिन काव्य प्रवाहातील कवींच्या काव्य प्रवाहातील अनवट काव्यनिष्ठेचे दाखलेही दिले. हे पुस्तक आयुष्याचे गाणे गात राहण्याची प्रेरणा देते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. जगण्याचे सत्व देणाऱ्या कवितेची आणि ती लिहिणाऱ्या कवींची ओळख या पुस्तकातून होते, असे भाष्य अपराजित यांनी केले.

‘स्मरण काव्यसंचिताचे’ या समीक्षणात्मक पुस्तकाचा हा प्रकाशन समारंभ शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. विशेष अतिथी म्हणून बोलताना डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांनी वाचन संस्कृती कमी होण्याच्या काळात विद्यार्थ्यांना मराठी कवींची उत्तम ओळख डॉ. अमृता इंदूरकर यांच्या पुस्तकामुळे होणार आहे, असे सांगितले. ते म्हणाले, विशेषत: अर्वाचीन कवींचा अभ्यास करताना स्नातकोत्तर विद्यार्थ्यांकरिता हे पुस्तक उपयुक्त आहे. डॉ. दंदे यांनी यावेळी डॉ. दंदे फाउंडेशनच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचीही माहिती दिली.

डॉ. श्याम धोंड यांनी पुस्तकाची विचक्षण समीक्षा करताना, ‘स्मरण काव्यसंचिताचे’ हे पुस्तक म्हणजे साहित्यिक आणि शैक्षणिक सफर घडवून आणणारा प्रवास असल्याचे सांगितले. हे पुस्तक द्रुतगतीतील चीजांची सादर केलेली सुरेल मैफल आहे, असे मर्मग्य भाष्य त्यांनी केले. कविता आपल्याला शहाणपण देते आणि भल्या बुऱ्याचा संस्कार देते, असेही ते म्हणाले. अनेकविध कवींच्या कवितांचे संदर्भही त्यांनी आपल्या विवेचनात दिले.

डॉ. इंदूरकर यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. आधुनिक मराठी कवितेची जडणघडण या पुस्तकातून मांडण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. विशाखा पवार यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, बबनराव‌ नाखले, वि. सा. संघाचे सचिव विलास मानेकर, बाल नाट्य चळवळीच्या आधारस्तंभ आभा मेघे, संपादकव्दय रमेश कुलकर्णी आणि अतुल पांडे मान्यवरांसह साहित्यप्रेमी मंडळींच्या भरगच्च उपस्थितीने सभागृह थिटे पडले.

#Nagpur
#MarathiLiterature
#BookLaunch
#SmaranKavyasanchitache
#AmrutaIndurkar
#ShripadAparajit
#LiteraryEvent
#PoetryLovers
#Kavita
#MarathiKavya
#SahityaSammelan
#ReadingCulture
#BookReview
#Inspiration
#CulturalEvent