अमरावती (Amravti) 8 ऑगस्ट
धो-धो कोसळत चेरापुंजीची (Cherrapunji)आठवण करून देणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी हजारो पर्यटक पावसाळ्यात चिखलदरा पर्यटन स्थळावर दरवर्षी येतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी मागील पंधरा दिवसांपासून संततधार पावसात ओलेचिंब घेऊन अनुभवला. चिखलदरा पर्यटन स्थळावर ७ ऑगस्टपर्यंत १०८८ मिलीमीटर पावसाची नोंद अप्पर प्लेटो येथील जलमापन केंद्रावर झाली आहे. गतवर्षीपेक्षा हा पाऊस अधिक आहे.
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर कोसळणाऱ्या धो-धो पावसाने हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून गगनचुंबी डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले आहेत. महाभारत काळाशी नाते सांगणारा भिमकुंड, जत्राडोहसह प्रमुख धबधबे आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पांच्या जलसाठ्यात मेळघाटातून वाहत येणाऱ्या प्रवाहांमुळे वाढ झालीआहे.
समुद्र सपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर लाखावर पर्यटकांनी हजेरी लावली आहे. दहा लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न स्थानिक नगरपालिकेला पर्यटकांच्या वाहन कारातून उपलब्ध झाले आहे.
निसर्गरम्य वातावरणात राज्यासह लागून असलेल्या मध्यप्रदेशातील पर्यटकांची पावले मेळघाटच्या नागमोडी वळणाच्या रस्त्यावर वळली आहे विशेष म्हणजे सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने चिखलदरा या पर्यटनस्थळी विविध ठिकाणच्या पर्यटकांची संख्याा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.