राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

0

बीड : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सकाळी परळी न्यायालयात हजर झाले. त्यानंतर त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट परळी न्यायालयाने अखेर (Parli Court cancel Raj Thackeray arrest Warrant) रद्द केले आहे. त्यांना पाचशे रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. राज ठाकरे यांना हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे. राज ठाकरे यांना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यावर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, हे विशेष.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने राज ठाकरे यांना सुरुवातीला ३ जानेवारी, नंतर १२ जानेवारीला बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, त्यानंतर न्यायालयाने तारीख वाढवून देत १८ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी राज ठाकरे परळीत दाखल झाले. त्यांनी न्यायालयात हजेरी लावत अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. राज ठाकरे यांची विनंती मान्य करून न्यायालयाने त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावत अटक वॉरंट रद्द केला.
पळशीत हुरडा पार्टी
तत्पूर्वी राज ठाकरे हे मुंबईहून हेलिकॅप्टरने परळी येथे न्यायालयात हजर होण्यासाठी राज ठाकरे निघाले असताना औरंगाबाद शहराजवळ पळशी गावात त्यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यास अवकाश असताना कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी हेलिपॅड जवळच असलेल्या एका रिसॉर्टवर राज ठाकरे यांनी हुरड्याचा आस्वाद घेतला. गरम हुरड्यासह नाश्ता घेऊन ते हेलिकॉप्टरने परळीला रवाना झाली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा