पदवीधर आमदार म्हणजे काय रे भाऊ ?

0

-पुरुषोत्तम आवारे पाटील

 

राज्यात पाच विधान परिषदेच्या  (Legislative Council) जागांसाठी येत्या ३० जानेवारीला मतदान होणार आहे. (Konkan, Aurangabad and Nagpur ) कोकण,औरंगाबाद आणि नागपूर या शिक्षक आणि नाशिक,अमरावती या पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. थोडक्यात तीन आमदार मास्तर अन दोन आमदार पदवीधर मतदार निवडून देणार आहेत. अमरावती विभागाचा विचार करायचा झाल्यास २लाख ६ हजार १७२ मतदार या निवडणुकीत मतदान करून आपला आमदार निवडणार आहेत. या निवडणुकीत मजेशीर ही बाब असते की मतदारांची नोंदणी दर सहा वर्षांनी होत असते. या मतदार संघातून निवडून येणाऱ्या आमदाराला सहा वर्षाचा कालावधी मिळत असतो. आहे की नाही नवल ? जो आमदार पाचसहा लाख लोकांमधून विधान सभेवर निवडून जातो ,त्याला पाच वर्षाचा आणि मोजक्या लोकांनी निवडलेल्या आमदाराला सहा वर्षाचा कालावधी मिळतो. इतर सोयी,सुविधा,वेतन आणि निधी सारखाच असतो.

अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघात आता २३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी अर्धेअधिक केवळ सवंग प्रसिद्धीचे भुकेले आहेत हे आता लपून राहिलेले नाही. पाच जिल्हे आणि सुमारे ३० विधानसभा मतदार संघात पसरलेल्या या मतदार संघात हाती असलेल्या दहाबारा दिवसात अपक्ष आणि छोट्या पक्षांचे उमेदवार कधी अन कुठे फिरतील हेच कळायला मार्ग नाही. ज्यांचे पक्ष किंवा संघटनेचे जाळे असेल असाच उमेदवार या मतदार संघात प्रभावी होऊ शकतो हे समजून घ्यायला कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. विधान सभेसारखी कुठेही मंडप उभारला की घेतली सभा असे ” वचवांगे ” धंदेही करण्याची सोय नाही कारण मतदार नेमके कोण आणि किती हे ओळखू येत नाही. त्यामुळे उमेदवारांनी आता शाळा,बँका आणि सरकारी कार्यालये यांच्या भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे.

पूर्वी पदवीधर मतदार संघाची निवडणूक कधी लागे अन कधी संपे हे कळत नव्हते. कारण तेव्हाही लोकांना यात फारसे स्वारस्य नव्हते. शिक्षणाचे प्रमाण वाढल्यावर आताही ते दिसत नाही. ज्या अकोला जिल्ह्यात १८ लाखाच्या वर मतदार आहेत त्या जिल्ह्यात केवळ ५० हजार ६०६ पदवीधर मतदार नोंदवले गेले आहेत. लोकसभेला असणाऱ्या १८ लाख मतदारांमध्ये कदाचित ३ ते ४ लाख पदवीधर असतील मात्र प्रत्यक्षात नोंदणी केवळ पन्नास हजार मतदारांनी केली असेल तर पदवीधर व्यक्तींना या निवडणुकीत किती स्वारस्य आहे हे दिसून येते.आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास केवळ २५ टक्के मतदार आपला आमदार निवडून देणार आहेत. या पन्नास हजारातही मोठी संख्या मास्तर लोकांची आहे ,कारण शिक्षक आमदार निवडून देताना पैठणी अन पाचशेच्या नोटांनी त्यांच्या डोक्यात आधीच हुशारीचे ” किरण ” शिरलेले आहेत.

चाणाक्ष मास्तर विद्यार्थ्यांचे नाईक आहेतच पण या निवडणुकीतही कुणी ” सरनाईक ” बनून मागच्या प्रमाणे कोटकल्याण करेल अशी चाहूल लागून मतदार नोंदणीतही गुरुजींनी मोठी मुसंडी मारली आहे. थोडक्यात ज्यांचा प्रतिनिधी निवडला जाणार आहे त्यांना या निवडणुकीचे काहीही देणेघेणे दिसत नाही ,गुरुजी मात्र शिक्षक आमदार निवडल्यावर आणखी पदवीधर प्रतिनिधी निवडून द्यायला पण आतुर झाले आहेत. मस्त आनंदीआनंद आहे. या निवडणुकीत कोणताही शिक्का मारायचा नसतो. आवडत्या उमेदवाराला पसंतीक्रम द्यायचा असतो. ज्याच्या मतपत्रिकेवर सर्वाधिक मतदारांनी क्रमांक एक लिहिला असेल तो निवडून येतो मात्र कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या,तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात आणि विजयी घोषित होतो,मोठी किचकट पद्धत असते ती. ही प्रकिया समजून घेणे म्हणजे डोक्याला शॉट असतो. ज्यांच्या हे लक्षात आले ते पहिल्या नव्हे दुसऱ्या पसंतीवर सुद्धा बाजी मारू शकतात.
रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांची नावे केवळ वर्तमान पत्रातूनच समजतात. मतदार म्हणून तुम्ही डोक्याला ताण नका देऊ. कारण यावेळी लढत डॉ. रणजित पाटील आणि धीरज लिंगाडे यांच्यात जरी होणार असली तरी वंचित आघाडीचे प्रा. डॉ. अनिल अमलकार आणि भाजपचे बंडखोर शरद झांबरे पाटील हे दखलपात्र उमेदवार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या घडीला डॉ. पाटील यांच्या हॅट्ट्रीकला कोणतीही अडचण दिसत नाही कारण त्यांचा अनुभव आणि पक्षाने सहा महिने अगोदर जाहीर केलेली उमेदवार आणि कितीही अंतर्गत वाद असले तरी कामाला लागलेला धोत्रे-सावरकर गट या त्यांच्या जमेच्या बाजू समजल्या जात आहेत. इतरांना अथांग पाणी तोडत विजयाचा किनारा गाठणे कठीण आहे मात्र या खेळात अशक्य काहीच नसते. शिक्षक मतदार संघात संपर्काची ठाकूरकी असणाऱ्या देशपांडेंना गाफील ठेवत शिक्षण सम्राट किरण बाप्पू ” सरनाईक ” ठरतील असे कुणालाही वाटले नव्हते परंतु जे घडले तो इतिहास झाला.