मुंबई (mumbai) : महिला मॉडेलबद्धल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्धल मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला चौकशीसाठी (Rakhi Sawant Arrested) अटक केली आहे. थोड्याच वेळात तिला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईच्या आंबोली पोलिसांनी राखीला अटक केली. मॉडेल शर्लिन चोप्रा (Model Sherlyn Chopra) हिने राखीच्या विरोधात ९ नोव्हेंबरला तक्रार दिली होती व त्यानंतर तिच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ती चौकशीसाठी हजर राहात नसल्याने पोलिसांनी तिला ताब्यात चौकशीसाठी आंबोली पोलीस ठाण्यात आणले होते. मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
राखीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रानं एक ट्वीट करून या कारवाईची माहिती दिली आहे. बिनधास्त वागण्यामुळे राखी सावंत ही कायम चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी तिने आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचा दावाही केला आहे. राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मिडियावर टाकून विवाहाची माहिती दिली आहे. ‘बिग बॉस 16 च्या सुरुवातीला अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राने दिग्दर्शक साजिद खानला शोमध्ये सहभागी केल्याबद्धल नाराजी व्यक्त केली होती.
साजिद खानने (Sajid Khan) आपल्याला अश्लील प्रकारे वागणूक दिल्याचा गंभीर आरोप तिने केला होता. साजिद खानने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील शर्लिनने केला होता. त्यानुसार अशा व्यक्तीला बिग बॉससारख्या शोमध्ये राहण्याचा हक्क नसल्याचे तिचे म्हणणे होते. राखी सावंतने या प्रकरणात उडी घेत काही वक्तव्ये केली होती. साजीद खानचे समर्थन करताना राखीने शर्लिनबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती.त्यावर ही तक्रार दाखल झाली होती.