भारतीय कुस्तीच्या क्षेत्रात वादळ, लैंगिक शोषणाचे महिला कुस्तीपटूंचे आरोप

0
भारतीय कुस्तीच्या क्षेत्रात वादळ, लैंगिक शोषणाचे महिला कुस्तीपटूंचे आरोप

नवी दिल्ली (new delhi) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) आणि भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्याविरोधात कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनास बसले आहेत. महिला पहेलवांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले असून बृजभूषणसिंह यांनी आरोपांचा (Wrestlers Protest Sexual Exploitation) इन्कार केला आहे. आरोप सिद्ध झाल्यास आपण स्वतः फाशी घेऊ, असे आव्हान त्यांनी दिले आहे. सहा महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. दरम्यान, या गंभीर आरोपांची दखल घेत या आरोपांवर येत्या ७२ तासांत उत्तर द्यावे, असे निर्देश केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला दिले आहेत. या गोंधळामुळे लखनऊ येथे आयोजित होणारे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबीरही रद्द करण्यात आले आहे.
जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया, विनेश फोगाट, रियो ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक तसेच सरीता मोर, संगीता फोगाट, सत्यव्रत मलिक, जितेंदर किन्हा तसेच सुमित मलिक या कुस्तीपटूंचा प्रामुख्याने समावेश आहे.
विनेश फोगाट हिने आरोप केला की, “प्रशिक्षक महिलांना त्रास देतात. महासंघाचे काही प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंनाही त्रास देतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑल्मपिक खेळण्यासाठी जातो, तेव्हा आमच्याकडे ना फिजिओ ना प्रशिक्षक असतो. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आम्हाला धमकावणे सुरु केले आहे.”
दरम्यान, ऑलम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम पदक विजेत्या कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर ७२ तासांत उत्तर द्यावे, असे निर्देश केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला दिले आहेत. दरम्यान, या आंदोलनाला राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न झाला. भाकप नेत्या वृंदा कारत या आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, या आंदोलनात आम्हाला राजकारण नको, अशी ठाम भूमिका कुस्तीपटूंनी घेऊन त्यांना मंचावरून उतरविले.
सरकार तुमच्यासोबत-बबिता फोगाट
दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने कुस्तीपटू बबिता फोगाट हिने आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेतली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सरकार कुस्तीपटूंसोबत असल्याचे आश्वासन आपण त्यांना दिले असल्याची माहिती बबिता फोगाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा