राम जन्मला ग सखे…

0

अवघा विदर्भ राममय

नागपूर. प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव (Birth anniversary of Lord Sri Ram) देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. कोरोना संकटामुळे तीन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात राम नवमीचे पर्व साजरे होत असल्याने भाविकांचा उत्साह अगदी ओसंडून वाहताना दिसतो आहे. विदर्भातही सर्वदूर जल्लोषाचे वातावरण आहे. राम मंदिरांसह अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळीही दुपारी १२ च्या ठोक्याला राम जन्माचा सोहळा पार पडला. हर्षोल्लासाच्या वातावरणात रामजन्माची गाणी, पूजन, आरती करण्यात आली. दुपारी १२ वाजता रामनामाचा जयघोष करण्यात आला. नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर (Poddareshwar Ram Temple )आणि रामनगरच्या श्रीराम मंदिरात अगदी भक्ती ओसंडून वाहिल्याचे दृष्य दिसले. सध्या दोन्ही मंदिरांमधून निघणाऱ्या शोभायात्रेची तयारी केली जात आहे. त्यात कार्यकर्ते व्यस्त असून भाविकांकडून दर्शनाचा क्रम सुरू आहे.

श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात पहाटे चार वाजता भगवान श्रीरामचंद्रांचा उत्थान, मंगल आरती, अभिषेक, अभ्यंगस्नान, सकाळी पाच वाजता शहनाई वादन, सकाळी ९ ते १० पर्यंत श्रीरामकृष्ण मठ संकीर्तन मंडळातर्फे श्रीराम संकीर्तन करण्यात आले तर सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत ओम हरे-हरे कृष्ण मानस आणि संकीर्तन मंडळातर्फे भजनाद्वारे महामंत्राचे संकीर्तन करण्यात आले. श्री राम जन्मोत्सव समिती चंद्रनगर पारडीतर्फे राम जन्मोत्सवानिमित्त आरती-पूजन पारपडले. सायंकाळी भव्य महाप्रसाद होणार आहे. रामटेक गडावरही भव्य आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू जवळच्या घोरात येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही राम जन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. विदर्भात सर्वत्र राम मंदिरांसह अन्य मंदिरांमध्ये जल्लोषाच्या वातावरणात राम जन्माचा सोहळा पार पडला. सर्वत्र भगव्या पताका लक्ष वेधून घेत आहेत. राम नामाची धून कानावर पडत असून अवघा विदर्भातच राममय वातावरण निर्माण झाले आहे. अरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही रामनवमी निमित्त हटके शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांनी रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. नवनीत राणा यांनी काळा पोशाख परिधान करून भगवी ओढणी बांधून बुलेट राईड केली आहे. तसेच, बुलेट चालवत ‘जय श्री राम’चा नारा दिला आहे. सध्या हा सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.